‘त्या‘ प्रकरणाबाबत अजित पवार अॅक्शन मोडमध्ये; धनंजय मुंडेंच्या अडचणीत होणार वाढ

ajit pawar and munde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर आरोप होत आहेत. यामध्ये भाजपच्या अंजली दमानिया (Anjali Damania) आणि माजी आमदार सुरेश धस (Suresh Dhas) वारंवार त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहेत.

उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मोठी कारवाई करत बीड जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटप प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी तीन सदस्यीय विशेष चौकशी पथक गठीत करण्यात आले आहे. या पथकालाएका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

निधी वाटपात गैरव्यवहाराचा आरोप

बीड जिल्हा नियोजन समितीच्या 2023-24 आणि 2024-25 या आर्थिक वर्षांतील निधी वाटपात गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यासह धनंजय मुंडे यांनी निधीचे वाटप पक्षपातीपणे केल्याचा आरोप ही करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर, बीड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये विकासकामांसाठी दुजाभाव केला गेल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.

राज्याचे अवर सचिव सुषमा कांबळी यांनी दिलेल्या आदेशानुसार धाराशिवचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी पथक गठीत करण्यात आले आहे. या पथकात अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयाचे अपर संचालक म. का. भांगे आणि जालना जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सुर्यवंशी हे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.

दरम्यान, चौकशी समिती जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या कामांची सद्यस्थिती तपासणार आहे. यामध्ये प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांचा आढावा घेतला जाणार आहे. त्याचबरोबर या कामांसाठी दिलेली तांत्रिक मान्यता, कार्यारंभ आदेश, निधी वितरण याची सखोल तपासणी केली जाईल. या संपूर्ण तपासाचा अहवाल एका आठवड्यात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या संपूर्ण प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे नाव जोडल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यातच आता निधी वाटपातील कथित गैरव्यवहारावरूनही त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे. अशातच अजित पवार यांच्या या कारवाईमुळे धनंजय मुंडे अडचणीत येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.