नवी दिल्ली । देशातील बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने आयटी क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिस आणि विप्रोच्या प्रत्येकी एका कर्मचाऱ्याला स्टॉक एक्सचेंजमध्ये ट्रेडिंग करण्यास बंदी घातली आहे. हे प्रकरण इन्फोसिसमधील इनसाइडर ट्रेडिंगशी संबंधित आहे.
SEBI ने बंदी घातलेल्या दोन लोकांमध्ये रमित चौधरी आणि केयूर मणियार आहेत. SEBI ने 27 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की,”” या दोन्ही कर्मचाऱ्यांनी जुलै 2020 मध्ये इन्फोसिसच्या व्हॅनगार्ड डील दरम्यान इनसाइडर ट्रेडिंग केले होते.”
Vanguard deal इनसाइडर ट्रेडिंग म्हणजे काय?
इन्फोसिसचे रमित चौधरी हे कंपनीचे सोल्युशन डिझाईन हेड होते आणि त्यांना Vanguard deal ची थेट माहिती होती. चौधरीकडे अशी काही माहिती होती जी सार्वजनिक नव्हती. ज्याच्या आधारावर रमित चौधरीने इन्फोसिसच्या शेअर्समध्ये ट्रेडिंग केले होते. चौधरीच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, ते एप्रिल 2021 मध्ये इन्फोसिसमध्ये सामील झाले.
SEBI च्या आदेशानुसार चौधरी विप्रोचे कर्मचारी मणियार यांच्या संपर्कात होते. चौधरीने इन्फोसिसची गुप्त माहिती त्याला फोनवर शेअर केली होती. 14 जुलै 2020 रोजी, या डिलची घोषणा होण्यापूर्वीच मणियार यांनी शेअर्स खरेदी केले आणि डिल जाहीर होताच ते विकून नफा कमावला. या ट्रेडिंगमधून त्याने 2.6 कोटी रुपये उभे केले होते.
यापूर्वी 1 जून 2021 रोजी SEBI ने इन्फोसिसचे दोन कर्मचारी आणि 6 कंपन्या आणि व्यक्तींना शेअर बाजारात ट्रेडिंग करण्यास बंदी घातली होती. जून 2020 च्या तिमाही निकालापूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये ट्रेडिंग केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. इनसाइडर ट्रेडिंगबाबत तक्रार आल्यानंतर इन्फोसिसने पुढील तपास सुरू केला.