हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. 18 जून ते दि. 23 जून या कालावधीत सातारा जिल्ह्यातून मार्गस्थ होणार आहे. तत्पूर्वी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पालखी सोहळ्याच्या मार्गाची व का ठिकाणी भेट देत पाहणी केली. तसेच या सोहळ्यादरम्यान सोयी सुविधाचे नियोजन करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच सातारा जिल्हयातील निरा नदी ते साधुबुवाचा ओढा या पालखी मार्गाची, पालखी मार्गावरील विसावा, दुपारचे भोजन स्थळ, पालखी तळ याचा पाहणी दौरा केला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी , पोलीस अधिक्षक समीर शेख,राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाचे संजय कदम आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले, पालखी सोहळ्यासाठी शुद्ध पिण्याचे पाणी, शौचालय, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था, वीज, रस्ते, अग्निशमन पथक, आरोग्य सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यासह पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी खंडाळा आणि फलटण तालुक्यातील सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. भाविकांची कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही यासाठी सर्वच यंत्रणांनी दक्षता घ्यावी. पालखी स्वागताची तयारी चांगल्याप्रकारे करावी.
शुद्ध पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात यावे. त्याची वेळोवेळी तपासणी करण्यात यावी. दवाखान्यांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा. राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाने महामार्गावर असलेले अडथळे त्वरित काढावे तसेच सर्व यंत्रणांनी पालखी सोहळ्याचे चांगल्यापद्धतीने नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप आणि वाईचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी पालखी सोहळ्यासाठी केलेल्या नियोजनाविषयीची माहिती दिली.