सत्तेची धुंदी चढलेल्या सरकारला आता जनताच खाली खेचेल; अजित पवारांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यास नुकतीच उपस्थिती लावली. या मेळाव्याच्या माध्यमातून पवारांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. ‘आपली तब्येत काय, आपण करतोय काय? नुसता शड्डू ठोकून विकासाचे प्रश्न सुटत नाहीत. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना पक्ष काढला, त्यांच्या नावावर मते मागून निवडून येऊन गद्दारी करून पन्नास खोके मिळविले. त्यांना यापुढे जनता माफ करणार नाही,’ अशी टीका पवारांनी हेली.

पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागात काळगाव फाटा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा झाला. यावेळी यावेळी अजित पवार म्हणाले की, ‘ज्यावेळी महाविकास आघाडीची सत्ता होती. त्या काळात राज्यातील जनतेच्या हिताचे अनेक चांगले निर्णय झाले. मात्र, जेव्हा शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले तेव्हा त्यांनी महाविकास आघाडीच्या काळातील कामे रद्द केली. आता फक्त जाहिरातबाजी करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम त्याच्याकडून केले जात आहे.

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेवेळी या जिल्ह्याने दोन खासदार, नऊ आमदार दिले. मात्र, मध्यंतराच्या काळात अनेकांनी पक्ष सोडला. त्यामुळे आपल्या जागा कमी झाल्या, परंतु येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कोणी गद्दारी करण्याचा अथवा पाय ओढण्याचा प्रयत्न करू नये, असे पवार यांनी म्हणाले.

ढेबेवाडी विभागात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यास माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, माजी सभापती सत्यजीतसिंह पाटणकर, सारंग पाटील, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांची उपस्थिती होती.