अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या दोन शिक्षकांना ‘झटपट’ शिक्षा

औरंगाबाद – महाविद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या दोन शिक्षकांना परिस्थितीजन्य पुराव्‍यांच्या आधारे पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा विशेष जिल्हा व सत्र न्‍यायाधीश ए. एस. खडसे यांनी ठोठावली. विशेष म्हणजे, गुन्‍हा दाखल झाल्यानंतर ९ महिन्‍ंयातच आरोपींना शिक्षा ठोठाविण्‍यात आली आहे. अनुप दामोधर राठोड (वय ३१, रा. आंबा तांडा ता. कन्‍नड) आणि संदीप हरिचंद्र शिखरे (व. ३२, रा. जवखेडा (बु) ता. कन्‍नड) अशी आरोपी शिक्षकांची नावे आहेत.

या प्रकरणात १७ वर्षीय विद्यार्थिनीने फिर्याद दिली होती. त्यानुसार, १२ फेब्रुवारी रोजी फिर्यादी तरुणीच्या महाविद्यालयास विद्यापीठातील पथक भेट देणार होते. त्यामुळे महाविद्यालयातील प्रयोगशाळेची साफसफाई करण्यासाठी फिर्यादीच्या वर्गशिक्षकाने फिर्यादीसह तिच्या दोन मैत्रिणींना बोलाविले होते. त्यानुसार फिर्यादी महाविद्यालयात गेली होती. वर्गशिक्षक प्रयोगशाळेची चावी आणण्यासाठी गेले होते तर तिच्या मैत्रिणी झाडू आणण्यासाठी गेल्या होत्या. ही संधी साधत वरील दोघे आरोपी शिक्षक तेथे आले, त्यांनी फिर्यादीशी अश्लील चाळे करत विनयभंग केला. फिर्यादी घाबरून तेथून पळत असताना संदीप शिखरे याने तिचा हात पकडला, त्यात फिर्यादीचा टॉप फाटला. ही घटना फिर्यादीने वर्गशिक्षक आणि प्राचार्याला सांगितली. प्रकरणात कन्‍नड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आरोपींना १६ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी अटक केली, तेव्‍हापासून दोघेही शिक्षक कारागृहात आहेत.

खटल्याच्‍या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता राजू पहाडिया यांनी एक तर अरविंद बागूल यांनी सात साक्षीदारांचे जबाब नोंदवले. विशेष म्हणजे सुनावणी सुरू असताना फिर्यादी तरुणीच फितूर झाली. तरीही न्‍यायालयाने परिस्थितीजन्‍य पुरावे आणि न्‍यायालयात सादर झालेल्या पुराव्‍यांच्या आधारे दोन्ही आरोपी शिक्षकांना दोषी ठरवत भांदवि कलम ३५४ आणि पोक्सोच्‍या कलम ८ व १२ अन्‍वये तीन वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्‍येकी दहा हजार रुपये दंड आणि पोक्सोच्‍या कलम १० अन्‍वये पाच वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्‍येकी १५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.