मुंबई । कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या तरी आंतरजिल्हा एसटी वाहतूक बंद राहणार असल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे. ही वाहतूक टप्प्याटप्याने सुरु करण्यात येणार आहे. रेड झोनमधून लोकांना आमच्या जिल्ह्यात सोडू नका असा अनेक ठिकाणी विरोधाचा सूर उमटल्यानंतर हा निर्णय घ्यावा लागल्याचे परब म्हणाले आहेत. याविषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यात येणार आहे. सुरुवातील ग्रीन झोन संदर्भातील विचार होणार असून रेड झोन संदर्भात सध्या विचार नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे येत्या काही दिवसात मुंबई, पुण्यातून लवकर एसटी सेवा सुरु होण्याची शक्यता सध्या दिसत नाही.
लॉकडाऊनमुळे राज्यातील विविध ठिकाणी अडकलेल्या इतर जिल्ह्यातील विद्यार्थी, कामगार, नोकरदार वर्गाला त्यांच्या तालुक्यात एसटीने सोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, एसटीच्या माध्यमातून रेड झोनमधून लोकांना आमच्या जिल्ह्यात सोडू नका असा विरोध राज्यातील अनेक जिल्ह्यातील नागरिकांकडून होत आता आहे. मुंबईतून कोरोना आमच्या गावात येईल अशी भीती त्यांना वाटत असल्यानं त्यांचा यासाठी विरोध झाला. या विरोधामुळं आम्ही निर्णय बदलल्याचे परब यावेळी म्हणाले.
दरम्यान, जे लोक परराज्याच्या सीमेवर जाण्यास इच्छुक आहेत त्यांना अद्यापही मोफत सेवा सुरु आहे. एका दिवसात २५० ते २७५ बसेसने पाच हजार प्रवासी परराज्याच्या सीमेवर सोडले आणि तीन हजार प्रवासी परराज्यांच्या सीमेवरुन आपापल्या जिल्ह्यात सोडले,” अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे. आंतरजिल्ह्याबाबत नीट नियोजन करुन, मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने अडकलेल्या लोकांची गावी जाण्याची व्यवस्था करु,असं अनिल परब यांनी सांगितलं आहे.
“लोक अडकलेत याची आम्हाला देखील जाणीव आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नियोजनबद्ध निर्णय घेत आहोत. जे लोक रस्त्यावरुन चालत आहेत, त्यांना आधी मोकळं करुन, जिल्ह्यांबाबतचा निर्णय घेऊ,” असं अनिल परब यांनी सांगितलं. यावेळी लोकांना आवाहन करताना त्यांनी म्हटलं की, एसटी डेपोमध्ये गर्दी करु नका, आपली काळजी आम्हाला आहे. लवकरात लवकर निर्णय घेऊ, कृपया स्टॅंडवर जाऊ नका. तिथे प्रक्रिया होणार नसून पोलीस स्टेशन किंवा तहसीलला प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”