नवी दिल्ली । सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी नटराजन कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. मात्र, BCCI ने म्हटले आहे की,”संघाचा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2021) दिल्ली कॅपिटल्स विरुद्धचा सामना पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार संध्याकाळी (22 सप्टेंबर) असेल. यासंदर्भात इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात कोरोनाच्या प्रवेशाबद्दल BCCI ला टोला लगावला आहे.
टी नटराजन कोविड -19 पॉझिटिव्ह असल्याच्या बातमीनंतर वॉनने लगेचच ट्विट केले, “आयपीएल शेवटच्या कसोटीप्रमाणे रद्द होते का ते पाहूयात ! ते होणार नाही याची मी गॅरेंटी देतो.” भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टरमध्ये खेळला जाणारा शेवटचा कसोटी सामना मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सपोर्ट स्टाफ कोविड -19 पॉझिटिव्ह असल्यामुळे रद्द करावा लागला.”
आयपीएलवर पुन्हा कोरोनाची सावली
डावखुरा वेगवान गोलंदाज नटराजन, जो गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर परतत आहे, तो दिल्लीविरुद्धच्या सामन्यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याच्या जवळच्या संपर्कात आलेल्या सहा जणांनाही आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले आहे. ज्यात भारतीय संघाबाहेर असलेला ऑलराउंडर विजय शंकरही आहे. BCCI च्या माहितीनुसार, “सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू टी नटराजन हा RT-PCR टेस्टमध्ये कोविड -19 साठी पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. या खेळाडूने स्वतःला उर्वरित संघापासून वेगळे केले आहे आणि आतापर्यंत त्याच्यामध्ये कोणतीही लक्षणे दिसली नाहीत.”
बातमी नुसार, हैदराबादच्या उर्वरित खेळाडूंची RT-PCR टेस्ट सकाळी 5 वाजता करण्यात आली ज्यामध्ये संपूर्ण टीम निगेटिव्ह आली. आज रात्री सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर वेळापत्रकानुसारच खेळवला जाईल. सनरायझर्स हैदराबाद संघातील नटराजन आणि सपोर्ट स्टाफसह एकूण 7 लोकांना आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये ऑलराउंडर विजय शंकर, टीम मॅनेजर विजय कुमार, फिजिओ श्याम सुंदर, डॉ अंजना, लॉजिस्टिक मॅनेजर तुषार खेडकर आणि नेट बॉलर पी गणेशन यांचा समावेश आहे.
नटराजनला आता 10 दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागेल आणि त्याचे बायो-बबलमध्ये परत येणे हे दोनदा निगेटिव्ह टेस्ट केल्यानंतरच होईल. सनरायझर्स हैदराबादसाठी हा मोठा झटका असेल कारण दुखापतीमुळे सघ पहिल्या टप्प्यात नटराजन खेळू शकला नाही. तीस वर्षीय नटराजनने आयपीएलमध्ये 24 सामन्यांत 20 विकेट्स घेतल्या आहेत.
भारतातील बायो-बबलमध्ये अनेक कोविड -19 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर आयपीएल मे मध्ये थांबवण्यात आली होती. जी आता यूएईमध्ये 19 सप्टेंबरपासून पुन्हा सुरू झाली आहे. त्यावेळी सनरायझर्स हैदराबादचे सीनियर विकेटकिपर फलंदाज रिद्धीमान साहा हा कोविड -19 पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. आणखी तीन प्रकरणे नोंदवण्यात आल्यानंतर ही लीग निलंबित करण्यात आली होती.