हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2022 साठी महाराष्ट्रात क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाच्या आयपीएल मधील सर्व सामने महाराष्ट्रात होऊ शकतात. देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना आयपीएलच्या आयोजनाचा विषय अवघड बनला आहे. त्यानुसार बीसीसीआयचे आयपीएलचे सामने महाराष्ट्रात घेण्याचा विचार करत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील यासाठी ग्रीन सिग्नल दिल्याचे समजत आहे.
मुंबईचं वानखेडे स्टेडियम, त्याच्या जवळच असलेलं ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मुंबईतील डी.वाय.पाटील आणि पुणे गहुजे येथे असलेलं महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनचं स्टेडियम या चार मैदानांवर संपूर्ण IPL चा सीजन खेळवण्याचा BCCI चा विचार आहे. या संदर्भात पाच जानेवारीला बीसीसीआयचे अंतरीम CEO व आयपीएलचे चीफ ऑपरेटींग ऑफिसर हेमांग अमीन यांनी मुंबई क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांची भेट घेतली.
त्यानंतर अमीन आणि पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. बीसीसीआयच्या प्रस्तावाला शरद पवारांनी हिरवा कंदिल दाखवल्याची माहिती आहे. त्यानंतर बीसीसीआय आणि एमसीएचे अधिकारी या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुख्स सचिव सीताराम कुंटे यांची भेट घेणार असल्याचे समजत आहे.