मुंबई । देशभरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता बीसीसीआयने खबरदारीचा उपाय म्हणून २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकली होती. केंद्र सरकार लॉकडाउन संदर्भात नेमकं काय निर्णय घेतंय हे पाहून स्पर्धा कधी खेळवली जाईल याचा निर्णय घेण्यात येणार होता. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण देशभरात लॉकाडउन ३ मेपर्यंत वाढवण्यात आल्याचं जाहीर केलं. त्यामुळे यंदाच्या हंगामातली आयपीएल स्पर्धा अनिश्चीत काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती बीसीसीआयमधील सुत्रांनी टाइम्स नौ या वृत्तवाहिनीला दिली आहे.
दरम्यानच्या काळात बीसीसीआय अधिक पर्यायांवर विचार करणार असून, परिस्थितीत सुधारणा न झाल्यास ही स्पर्धा थेट पुढच्या वर्षी खेळवली जाऊ शकते अशीही माहिती सुत्रांनी दिली. मध्यंतरी बीसीसीआय जुन-जुलै महिन्यात स्पर्धा खेळवण्याचा विचार करत होती. त्याआधीही सप्टेंबर महिन्यात आयपीएल खेळवता येईल का याबाबतही विचार सुरु होता. मात्र या कालखंडात आशिया कप आणि इतर महत्वाच्या स्पर्धा असल्यामुळे अन्य देशातील खेळाडू या स्पर्धेसाठी येऊ शकणार नाहीत. त्यातच ऑस्ट्रेलियात सरकारने ६ महिने लॉकडाउन घोषित केलं असल्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या उपलब्धतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. अशा परिस्थितीत बीसीसीआयकडे आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यापलीकडे कोणताही पर्याय नसल्याची माहिती सुत्रांनी दिली. स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागणार आहे. त्यामुळे स्पर्धा थेट रद्द न करता बीसीसीआय सावध पवित्रा घेऊन आगामी काळात आणखी काही पर्याय उपलब्ध होतात का हे पाहणार असल्याचंही समजतं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”