IPL चा तेरावा हंगाम UAE मध्ये आयोजित करण्याचे संकेत, BCCI सूत्रांची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका भारतात क्रीडा क्षेत्रालाही बसला. बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला. मात्र ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होणार आहे. यासाठी वर्षाअखेरीस बीसीसीआय या स्पर्धेचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलचा तेरावा हंगाम युएई मध्ये भरवला जाणार असल्याचं कळतंय. आयोजनासाठी भारत पहिलं प्राधान्य असल्याचं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट केलं होतं, परंतू श्रीलंका आणि युएई या दोन देशांमध्ये आयोजनाचा पर्याय बीसीसीआयने खुला ठेवला होता. परंतू भारतामधील बहुतांश शहरात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर आलेली नसल्यामुळे अखेरीस बीसीसीआयने UAE मध्ये आयोजन करण्याचं ठरवल्याचं कळतंय.

काही दिवसांपूर्वी आयपीएल संघमालकांची एक बैठक झाली, ज्यात कोणीही आयपीएलचं आयोजन भारताबाहेर करण्यावर आक्षेप नोंदवला नाही. सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात बीसीसीआय आयपीएलचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे. ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर महिन्यात होणारा टी-२० विश्वचषक यंदा रद्द होणार आहे. आयसीसीने याबाबत अधिकृत घोषणा केली नसली तरीही क्रिकेट ऑस्ट्रेलियातील काही सूत्रांनी ही स्पर्धा रद्द झाल्याची घोषणा करणं निव्वळ औपचारिकता असल्याचं सांगितलंय. Outlook ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. २०१४ साली आयपीएलच्या हंगामातील सुरुवातीचे काही सामने युएईमध्ये भरवण्यात आले होते.

करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, युएईमधले सामनेही प्रेक्षकांविनाच खेळवले जातील. आयपीएल सामन्यांच्या टिव्ही प्रक्षेपणाच्या हक्कांमधून बीसीसीआय व इतर संघमालकांना फायदा होत असल्यामुळे, प्रेक्षकांविना सामने खेळवण्यात कोणाचाही विरोध नसल्याचं एका संघमालकाने सांगितलं. दुबई, शारजा आणि अबु धाबी अशा ३ ठिकाणांवर मैदानं असल्यामुळे बीसीसीआयसाठी युएई हा उत्तम पर्याय असल्याचं बोललं जातंय.