मुंबई प्रतिनिधी | शिवस्मारकाच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला आहे. शिवस्मारकाच्या कामातील अनियमितता आणि गैरव्यवहार या बाबत कॅगच्या अधिकाऱ्याने तक्रार केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन केला आहे.
स्मारकाची एक विट देखील नरचता स्मारकासाठी ८० कोटी रुपये खर्च कसे झाले. संबंधित लेखापालांनी लिहलेले पत्र मलिक आणि सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत उघड केले आहे. सरकारने स्मारकाची उंची १२१. २ मीटर एवढी ठेवली मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची मात्र कमी केली आणि तलवारीची उंची वाढवली असा घणाघाती आरोप काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी केला आहे.
शिवस्मारकाच्या कामाचे टेंडर काढल्यानंतर त्या टेंडर मध्ये फेरबदल झाले कसे. एकदा टेंडर काढल्यानंतर त्यात फेरबदल केले जाऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत टेंडरमध्ये बदल कसे झाले आसा सवाल काँग्रेस आघाडीच्या प्रवक्त्यांनी विचारला आहे. संबंधित लेखापालाने टेंडरच्या कागदपत्रावर एक नोट लिहली आहे. त्या नोट मध्ये म्हणले आहे की, शिवस्मारकाच्या कामात केले जाणारे फेरबदल हे नियमांना धरून नाहीत. त्यामुळे शिवस्मारकाचे काम पूर्ण झाले तरी त्याचा दर्जा निकृष्ट असेल असे त्या अधिकाऱ्याने नोट मध्ये म्हणले आहे असे काँग्रेस आघाडीचे प्रवक्ते म्हणाले आहेत. त्याच प्रमाणे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जावी अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.