हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नारळ पाणी हे आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर पेयांपैकी एक मानले जाते. दररोज नारळ पाणी पिणे हा तुमच्या निरोगी आहाराचा एक भाग असू शकतो. जेव्हा आपण रुग्णालयात एखाद्या रुग्णाला भेटायला जातो तेव्हाही आपण खास करून नारळपाणी घेऊन जातो. परंतु नारळाचे पाणी चवीला हलके गोड असते, त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांना याचे सेवन करता येईल का?, असा प्रश्न पडतो. आज आपण तुमच्या या प्रश्नाचे निरसन करूया .
खरं तर तज्ज्ञांच्या मते, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी नारळाचे पाणी फायदेशीर ठरू शकते. नारळाच्या पाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स फक्त ३ असतो ज्यामुळे ते मधुमेही रुग्णांसाठी योग्य पेय बनते. 55 पेक्षा कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ मधुमेहामध्ये खूप फायदेशीर मानले जातात. नारळाच्या पाण्यात आढळणारे पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी इत्यादी इंसुलिनचे कार्य सुधारण्यास मदत करतात, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. मात्र नारळाचे पाणी जास्त प्रमाणात सेवन करू नये.
नारळाच्या पाण्यात कॅलरी आणि कार्ब्सचे प्रमाण खूपच कमी असते. पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियम व्यतिरिक्त, त्यात विविध प्रकारचे इलेक्ट्रोलाइट्स असतात ज्यांची शरीराला चांगल्या प्रकारे कार्य करण्यासाठी नियमितपणे आवश्यकता असते. शरीराला हायड्रेट आणि ऊर्जावान ठेवण्यासाठी नारळाचे पाणी खूप उपयुक्त ठरू शकते. याशिवाय मधुमेह वाढल्यास नजर धूसर होत जाते. अशा वेळी नारळ पाण्याच्या सेवनाने मधुमेहाच्या रुग्णांना फायदा होतो.