हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतली . दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीत तब्बल दीड तास चर्चा झाल्याचं बोललं जाते. या चर्चेदरम्यान आगामी मुंबई महापालिका निवडणूक हाच मुख्य अजेंडा होता . या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधूंनी जागा वाटपावर बोलणी केल्याचं समोर आलं आहे. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला असलेल्या अनेक जागा मनसेने मागितल्याचे बोलले जाते. राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे उद्धव ठाकरेंची चांगलीच गोची झाली आहे.
मनसेचा कोणत्या जागांवर दावा
उद्धव ठाकरे असो व राज ठाकरे दोघांची मुंबईतील ताकद एकच आहे ती म्हणजे मराठी माणूस….. त्यामुळे ज्या भागात मराठी माणसाची संख्या जास्त आहे अशा भागांवर दोन्ही पक्षाचे वर्चस्व आहे. हेच वर्चस्व टिकवण्यासाठी जास्तीत जास्त मराठीबहुल जागांवर लढण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न नाही. आणि इथेच नेमका जागा वाटपाचा तिढा निर्माण होतोय. मराठीबहुल भागातील अधिकाधिक प्रभाग मिळावेत यासाठी मनसे आग्रही आहे. एवढच नव्हे तर उद्धव ठाकरेंकडे विद्यमान नगरसेवक असलेल्या 20 ते 25 जागांचीही मनसेकडून मागणी केली जात आहे. याशिवाय ठाकरेंकडून शिंदे गटात गेलेल्या काही नगरसेवकांच्या जागांसाठीही मनसे आग्रही असल्याची माहिती आहे.
दादर माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, भांडूप, जोगेश्वरी या मराठीबहुल भागातील प्रभागांसाठी दोन्ही ठाकरे बंधुंमध्ये रस्सीखेच सुरु आहे. नसेने कितीही जागा मागितल्या तरी मनसेची संबंधित प्रभागातील संघटनात्मक ताकद, तगडा उमेदवार बघूनच जागा सोडण्यावर शिवसेना ठाकरे गट ठाम आहे. त्यामुळे कोण कुठून लढणार? याबाबत ठाकरे बंधूंच्या चर्चेमध्ये काल ठोस तोडगा निघाला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दोन्ही बंधुंमध्ये चर्चेच्या आणखी काही फेऱ्या अपेक्षित आहेत. निवडून येवू शकणाऱ्या एकेका जागांवर सखोल चर्चा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात होत आहे.




