कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून मनोमिलनाचे प्रयत्न सुरू आहेत. पण विरोधकांचे संभाव्य मनोमिलन हे मनोमिलन नव्हे तर ते मनीमिलन होते, अशी टीका कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केली.
कराड तालुक्यातील वडगाव हवेली येथे कृष्णा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे विद्यमान व्हाईस चेअरमन व उमेदवार जगदीश जगताप, सयाजी यादव, बबनराव शिंदे, बाजीराव निकम, जयवंतराव कृष्णा जगताप, आनंदराव मोहिते, उपसरपंच राजेंद्र थोरात, माजी सरपंच सत्यवान जगताप, दिलीप चव्हाण, भानुदास जगताप, शिवराज जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. भोसले म्हणाले, सत्तेत येण्यापूर्वी अडचणीत असलेला कारखाना आमच्या कार्यकाळात अम्ही सुस्थितीत आणला. यावेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सभासदांना दिलेली वचनपूर्ती करण्यात आम्ही कुठेही कमी पडलो नाही. सभासदांच्या हिताच्या दृष्टीने अनेक योजना कारखान्याच्या माध्यमातून राबविल्या. विरोधकांचे मनोमिलन हा स्वार्थापोटी केलेला प्रयोग असून, तो अयशस्वी होताना दिसतोय.
जगदीश जगताप म्हणाले, डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचा पारदर्शी कारभार सभासदांना पाहायला मिळाला आहे. कारखान्याच्या व सभासदांच्या हितासाठी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य देण्याची आवश्यकता आहे. यावेळी जयवंतराव जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. अशोक जगताप यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. श्रीरंग साळुंखे यांनी आभार मानले.