हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या काळात ठाकरे सरकार निर्लज्ज राजकारण करत आहे. सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा महाराष्ट्राला केला जात आहे. आता महाराष्ट्राला ऑक्सिजनची मागणी कमी करावी असा सल्ला केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिला होता. मात्र त्यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांना पलटवार केला आहे.’ पियुष गोयल यांनी महाराष्ट्रावर टीका करण्यापेक्षा इथल्या मातीचे ऋण फेडले तर बरं होईल असे खडे बोल बाळासाहेब थोरात यांनी गोयल यांना सुनावले आहेत’. ते मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पियुष गोयल महाराष्ट्रविरोधी तुणतुणे वाजवत आहेत
यावेळी बोलताना त्यांनी पियुष गोयल यांच्यावर टीका करत म्हटलं की, केंद्रीय मंत्री पियुष गोयल महाराष्ट्राची वकिली करायची सोडून जावडेकरांप्रमाणे महाराष्ट्रविरोधी तुणतुणे वाजवत आहेत. असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस ठाण्यात जाणे अयोग्य असल्याचं म्हटले आहे. राज्यात सध्या रेमडिसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. आम्ही लोकांना मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. निर्यातबंदी झाल्यानंतर रेमडिसिवीर इंजेक्शन एखाद्या पक्षाला नव्हे तर राज्य सरकारला मिळायला हवे होते. देवेंद्र फडणवीस यांनी रेमडिसिवीर इंजेक्शनचा साठा महाराष्ट्राला मिळवून देण्यासाठी मदत करायला हवी होती. मात्र ते फार्मा कंपनीच्या मालकासाठी पोलीस ठाण्यात गेले. ही गोष्ट मला पटलेली नाही असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.