जळगाव जिल्ह्यात माजी सरपंचावर थरारक खुनी हल्ला, 8 जणांवर FIR दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव । शेतजमिनीच्या वादातून पाचोरा तालुक्यातील तारखेडा खु येथील माजी सरपंचावर 8 जणांनी हल्ला केला. या घटनेत तिघेजण गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात 8 जणांविरुद्ध गन्हा दाखल करण्यात आला असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना बुधवारी (दि.9) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

या घटनेत माजी सरपंच मधुकर दौलत पाटील (वय-57 रा. तारखेडा खु, ता. पाचोरा), त्यांचा भाऊ चैत्राम दौलत पाटील, पुतण्या रोशन चैत्राम पाटील हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दशरथ रघुनाथ पाटील, राजेंद्र दशरथ पाटील, जयेश दशरथ पाटील, दिपक बाळकृष्ण पाटील (सर्व रा. तारखेडा खु. ता.पाचोरा) आणि 4 अनोळखी दुसऱ्या गावातील इसम यांच्याविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मधुकर पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दशरथ पाटील आणि फिर्यादी यांच्यामध्ये शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद आहेत. बुधवारी (दि. 9) फिर्यादी मधुकर पाटील हे मजुरांनी काढलेल्या कपाशीचे वजन करण्यासाठी शेतामध्ये गेले होते. त्यावेळी आरोपी दशरथ पाटील याने शिविगाळ करण्यास सुरुवात केली. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी गेले असता दशरथ पाटील याने आपल्या मुलांना आणि 4 बाहेर गावाहून आलेल्या गुंडांना बोलावून घेत मधुकर पाटील यांच्यावर काठीने आणि लोखंडी सळईने हल्ला चढवला. आरोपींनी फिर्यादी यांच्यासह त्यांचा भाऊ आणि पुतण्याला बेदम मारहाण केली. तसेच दशरथ पाटील याने मधुकर पाटील यांचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

आरडाओरडा ऐकून मुख्य रस्त्याने इतर शेतकरी येण्याची चाहूल लागताच सर्व आरोपी दुसऱ्या रस्त्याने पसार झाले. गावातील जमलेल्या लोकांनी जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेत मधुकर पाटील यांच्या डोक्यावर सळईने वार झाला असून नाकाचे हाड फॅक्चर झाले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल मालचे करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment