जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगावमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. आपण रागाच्या भरात उचललेले पाऊल एखाद्याचे आयुष्य उध्वस्त करते. अशीच एक घटना जळगावमध्ये घडली आहे. जळगावमध्ये एका व्यक्तीने आपल्या वहिनीची निर्घृणपणे हत्या केली. या महिलेला 8 वर्षांचा मुलगा आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी या महिलेने आपल्या पतीला गमावले होते. आता आईचा खून झाल्याने 8 वर्षांचा मुलगा अनाथ झाला आहे.
काय आहे प्रकरण
जळगावाच्या पिंप्राळा परिसरातील मयूर कॉलनीमध्ये हि घटना घडली आहे. या ठिकाणी योगिता मुकेश सोनार या आपल्या 8 वर्षांच्या मुलासोबत राहत होती. या महिलेचे तिचा दीर दीपक सोनार हिच्याशी गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. कौटुंबिक कारणावरून हे वाद सुरु होते. यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत होती. 2 दिवसांपूर्वीदेखील त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाला होता. पण ह्यावेळी दीपक हा प्रचंड रागात होता आणि त्याने रागाच्या भरात वहिणी योगिता हिची डोक्यात कुऱ्हाडीने वार करत अत्यंत निर्घृणपणे हत्या केली.
मृत योगिता सोनार या शहरातील मयूर कॉलनीतमध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होत्या. त्यांचे पती मुकेश सोनार यांचे 10 महिन्यांपूर्वी अपघातात निधन झाले होते. यानंतर काही दिवसांत योगिता यांचे सासरे लोटन सोनार यांचंदेखील निधन झाले. या सगळ्यानंतर योगिता आणि त्यांचा दीर दीपक यांच्यात वारंवार वाद होत होते. याच वादातून दीपकने त्याची वाहिनी योगिता हिची हत्या केली आहे. या सर्व प्रकारामुळे तो 8 वर्षांचा मुलगा मात्र अनाथ झाला. त्याने 10 महिन्यांपूर्वी आपल्या वडिलांना गमावले होते आणि आता त्याने आपल्या आईला गमावले आहे. कदाचित कुटुंबीय त्याचा सांभाळ करतीलसुद्धा पण आता आई वडिलांचं छत्र कायमचे त्याच्या डोक्यावरून गेले आहे.