धुळे प्रतिनिधी | शिवसेनेचे नेते सुरेश जैन आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर घरकुल घोटाळा प्रकरणी आरोप निश्चित करण्यात आले आहेत. त्यांच्यासह ४८ जणांना ताब्यात घेण्याचे निर्देश धुळे सत्र न्यायालयाने दिले आहेत. तसेच कोणत्याही क्षणी न्यायालय या प्रकरणी शिक्षेची सुनावणी करू शकते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेसाठी हा खूप मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. तर या निकालाचे पडसाद राज्याच्या राजकारणावर देखील उमटण्याची शक्यता आहे.
न्यायालयीन कामकाजाला सुरुवात होताच न्यायाधीशांनी आरोपींच्या वकिलाला तुम्हाला या संदर्भात काय सांगायचे आहे का असा प्रश्न केला. त्यावर या प्रकरणातील आरोपी सुरेश जैन आणि गुलाबराव देवकर हे आता वयोवृद्ध झाले आहेत. त्याच प्रमाणे त्यांचा या प्रकरणाशी कसलाही संबंध नाही. त्यांना गुंतवण्याचा प्रयत्न केला जात आहे असे म्हणण्यात आले. त्यावर उलट सुलट युक्तिवाद झाल्या नंतर न्यायालयाने आपला निकाल देण्याचे म्हणले आहे. त्याआधी गुलाबराव देवकर आणि सुरेश जैन हे दोषी असल्याचे न्यायायने जाहीर करत त्यांना ताब्यात घेण्याचे निर्देश दिले आहेत.
न्या. सृष्टी नीलकंठ यांच्या समोर न्यायालयीन कामकाज सुरु आहे. घरकुल घोटाळ्या प्रकरणी सुरेश जैन यांना याआधी अटक देखील करण्यात आली होती. घरकुल घोटाळा प्रकरणी ५२ आरोपी असल्याचे तपासातून सिद्ध झाले होते. त्यानंतर ३ आरोपीचा खटला न्यायालयात असताना नैसर्गिक मृत्यू झाला. तर १ आरोपी अद्याप फरार आहे. गुलाबराव देवकर आणि सुरेश जैन हे या प्रकरणी मुख्य आरोपी आहेत.