पोलीस निरीक्षकाने कीर्तनस्थळी बूट घालून कार्यक्रम बंद केल्याने वारकरी संतप्त

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगावमधील चाळीसगाव या ठिकाणी एका पोलीस अधिकाऱ्याने बंद पाडलेल्या कीर्तनावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. चाळीसगावमधील हनुमानसिंग राजपूत नगर येथील सप्तश्रृंगी मंदिराजवळ रात्रीच्या वेळी माईक आणि स्पिकर लावून कीर्तन सुरू होते. यादरम्यान शहर पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी हे कीर्तन बंद पाडले. एवढेच नाहीतर ते बूट घालून नारदाच्या गादीवर चढले आणि त्यांनी वारकरी संप्रदायाला खडेबोल सुनावले. यामुळे भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली. पोलीस निरीक्षकांच्या या कृतीमुळे संतप्त झालेल्या वारकरी संप्रदायाने राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

चाळीसगावमधल्या सप्तश्रृंगी मंदिराजवळ रात्रीच्या वेळेला माईक आणि स्पिकर लावून कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी शहर पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी सुरू असलेले कीर्तन बंद केले. एवढंच नाहीतर ते वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा विषय असेलल्या नारदांच्या गादीवर बूट घालून वर चढले आणि त्यांनी वारकरी संप्रदायाला खडेबोल सुनावले, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या पोलीस निरीक्षकांचा तसा एक फोटोसुद्धा समोर आला आहे. रात्री दहा वाजून गेले होते. त्यानंतरही कीर्तन सुरू होते म्हणून पोलीस निरीक्षकांनी हि कारवाई केली मात्र त्यांची वागणुकीची पद्धत अतिशय चुकीची होती, असा आरोप वारकरी संप्रदायातील मंडळींनी केला आहे.

पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या वागणुकीमुळे वारकरींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांनी केलेल्या कृत्याची तात्काळ माफी मागावी. अन्यथा आम्ही राज्यव्यापी आंदोलन छेडू, असा इशारा वारकऱ्यांकडून देण्यात आला आहे. या प्रकरणी चाळीसागवामधूनही नाराजीचा सूर उमटत आहे. पोलीस निरीक्षकांनी कीर्तनात चक्क बूट घालून प्रवेश केल्याबद्दल निषेध व्यक्त करण्यात येत आहे. वारकरी संप्रदाय अतिशय उदार मानला जातो. इतरांसारखे ते कट्टर नसतात. त्यांच्यामुळे कधी गावात दंगली घडल्या नाहीत. तरीदेखील त्यांच्यासोबत अशी वर्तवणूक केल्याबद्दल गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे.