जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जर आपण कोणत्या संकटात सापडलो असेल तर 112 हा पोलीस नियंत्रण कक्षाचा टोल फ्री नंबर डायल करून पोलिसांची मदत घेता येते. मात्र जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील डांगर गावातील एका तरुणाने याचा दुरुपयोग केला आहे. त्याने 112 नंबरवर कॉल करून पोलिसांना खोट्या भांडणाची माहिती दिली आहे. पोलिसांचा वेळ वाया घालवून दिशाभूल केल्यामुळे त्याच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे.
आधी नागरिकांच्या मदतीसाठी 100 नंबर देण्यात आला होता. मात्र, लहान मुले, दारुडे आणि समाजकंटकांमुळे ठाणे अंमलदाराला यामुळे त्रास होत होता. यामुळे शासनाने 100 नंबर बंद करून 112 हा टोल फ्री नंबर सुरू केला होता. यासाठी स्वतंत्र पोलीस आणि वाहने तैनात करण्यात आली आहेत. अमळनेर तालुक्यातील डांगर येथील धनराज कडू भिल या तरुणाने 22 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास 112 नंबरवर कॉल करून गावात वाद झाल्याची तक्रार केली आणि मदतीची मागणी केली. यावेळी नियंत्रण कक्षाकडून 112 च्या कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी मिलिंद भामरे व सूर्यकांत साळुंखे यांना घटनेची माहिती देण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी मिलिंद भामरे व सूर्यकांत साळुंखे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी धनराज याने मी सहज मजाक मजाकमध्ये 112 ला कॉल केला. भांडण वगैरे नाही. पोलीस खरंच मदतीला येतात की नाही हे पाहत होतो, असे सांगितले. तसेच आरोपीने यावेळी दरदेखील प्यायली होती. यानंतर पोलिसांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना हकीकत यांना या घटनेची माहिती देताच आरोपीवर भादंवि कलम 182 आणि दारूबंदी कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आरोपी धनराज याला पोलिसांशी केलेली मस्करी महागात पडली आहे.