हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला अवघे काही दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर 22 जानेवारी रोजी महाराष्ट्रात देखील सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शुक्रवारी राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या अगोदर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता राज्य सरकारने देखील सुट्टी जाहीर केली आहे.
सध्या संपूर्ण देशभरामध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा पाहायला मिळत आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये सहभागी होता यावे यासाठी कर्मचाऱ्यांनी सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली होती. तसेच, राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीत, 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी मागणी केली होती. या मागणीनंतरच राज्य सरकारने सुट्टीची घोषणा केली आहे.
दरम्यान, 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठेचा भव्य सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करण्यात येत आहे. अयोध्येत होणाऱ्या सोहळ्यानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम, पूजा, विधी करण्यात येणार आहेत. अशातच राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टीची घोषणा केल्यामुळे राम भक्तांना या कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येणार आहे.