सातारा प्रतिनिधी | कोरोना महामारीच्या काळातून जग जात असताना अनेक गोष्टींवर नाईलाजाने का होईना निर्बंध घालावे लागत आहेत. सोशल डिस्टनसिंगचं पालन करण्यासाठी लोकांना आधार वाटणारी देवस्थानंही बंदच ठेवण्याचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात येत आहे. शाळा-महाविद्यालयांनीही त्यांचे ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर देवस्थानं तात्पुरत्या स्वरुपात खुली करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असला तरी महाराष्ट्र सरकारने मात्र याला अद्यापही परवानगी दिलेली नाही.
साताऱ्यातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या जरंडेश्वर या ठिकाणीसुद्धा यंदाच्या श्रावण महिन्यात भाविक भक्तांना येण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. दरवर्षी श्रावणातील शनिवारी जरंडेश्वर गडावर होणारी यात्रा यंदा कोरोना संकटामुळे रद्द करण्यात आली आहे. याशिवाय भाविकांनी आठवड्यातील इतर कोणत्याही वारी जरंडेश्वरला यायचा प्रयत्न करु नये असं आवाहन श्री जरंडेश्वर देवस्थान ट्रस्ट यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्या सूचनेनुसार केलं आहे.
जरंडेश्वर देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत जांब बुद्रुक, कोरेगाव पोलीस स्टेशन आणि ग्रामदक्षता समिती यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. जरंडेश्वरला जाण्यासाठी जांब बुद्रुक, सातारा रोड,जळगाव,भीमनगर, पाडळी, वडूथ, बोरखळ या ठिकाणाहून असलेले रस्ते बंद करण्याचा निर्णय कोरोना सनियंत्रण समितीने घेतला आहे. यावेळी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा तसेच येणारी वाहने जप्त करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
या बैठकीवेळी जांबच्या सरपंच सौ. शितल कुंभार, तलाठी सी.एस.गायकवाड, ग्रामसेवक श्रीमती एम.ए.राऊत, पोलीस पाटील सुधीर निकम, ग्रामपंचायत सदस्या अर्चना निकम यांची उपस्थिती होती.