हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्य सरकारने (State Government) मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण (Maratha Aarakshan) दिले असले तरी त्याला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळेच आता सरकारच्या या निर्णयाविरोधात पुन्हा एकदा मनोज जरांगे मैदानात उतरणार आहेत. लवकरच जरांगे पाटील हे तब्बल 900 एकरावर विराट सभा घेणार आहेत. त्यांच्या या सभेला लाखोपेक्षा अधिक मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत. मुख्य म्हणजे, लोकसभा निवडणुकीपूर्वीच बीड जिल्ह्यात ही सभा होणार असल्याची माहिती जरांगे पाटलांनी दिली आहे.
900 एकरावर होणार भव्य सभा
सध्याच्या घडीला म्हणून जरांगे पाटील आपल्या भव्य सभेसाठी जागेची पाहणी करत आहेत. तर काहींनी या सभेच्या तयारीला देखील सुरुवात केली आहे. जरांगे पाटलांची ही सभा तब्बल 900 एकरावर भरवण्यात येईल. त्यामुळे त्या सभेला मोठा मराठा जनसमुदाय उपस्थित राहील असे सांगितले जात आहे. तसेच, या सभेच्या माध्यमातून जरांगे पाटील सरकारने दिलेल्या आरक्षणाला जोरदार विरोध दर्शवतील आणि हे आरक्षण मराठा समाजाच्या हिताचे कसे नाही हे देखील सांगतील. त्यामुळे या सभेच्या माध्यमातून पुन्हा एकदा जरांगे पाटील आणि सरकारमध्ये वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एकीकडे राजकीय नेते लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असताना दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावर जालन्यात मराठा समाज पुन्हा आक्रमक झाल्याचा पाहिला मिळत आहे. कारण जालना जिल्ह्यामध्ये राजकीय नेत्यांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. जालन्याच्या एका गावामध्ये रावसाहेब दानवे आणि नारायण कुचे गेले असता त्यांना मराठा तरुणांनी पुन्हा गाडीतून माघारी पाठवल्याचा प्रकार घडला. यातूनच सरकारने दिलेले आरक्षण मराठा समाजाने स्वीकारलेल्या असल्याचे स्पष्ट दिसत आहे. याचाच परिणाम आगामी निवडणुकीवर देखील होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान राज्य सरकारने ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे याचबरोबर सगे-सोयरे शब्दाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. मात्र या मागणीबाबत सरकार कोणताही विचार करताना दिसत नाहीये यामुळेच आता जरांगे पाटील यांनी पुन्हा सरकार विरोधात मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.