जय शाह यांची मोठी घोषणा!! पिच क्यूरेटर आणि ग्राउंड्समनना 25 लाखांचे बक्षीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच IPL अखेर संपली. कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैद्राबादचा पराभव करत यंदाच्या आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. BCCI कडून विजेत्या- उपविजेत्या संघासह दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना बक्षिसे सुद्धा जाहीर केली. त्यानंतर आता BCCI चे सचिव जय शहा (Jay Shah) यांनी पिच क्यूरेटर आणि ग्राउंड्समनसाठी एक मोठी घोषणा केली आहे. आयपीएलच्या 10 होम टीमच्या ग्राऊंड्समन आणि पिच क्यूरेटर यांनी प्रत्येकी 25 लाख आणि अतिरिक्त तीन ठिकाणांवरील प्रत्येकाला 10 लाख रूपये देण्याचे जय शाह यांनी जाहीर केलं आहे.

खरं तर मैदानावर क्रिकेटपटू खेळत असतात आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात मात्र पडद्यामागचे खरे कलाकार तर ग्राउंडमन आणि पीच क्युरेटर असतात. यावर्षीच्या आयपीएल मध्ये अनेक सामन्यात पावसाचा व्यत्यय आला. अशावेळी पाऊस पडून गेल्यावर सामना लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी ग्राऊंड्समन आपली सर्व ताकद पणाला लावत होते. ग्राऊंड्समनची धडपड संपूर्ण जगाने उभ्या डोळ्याने बघितली आहे. बीसीसीयआयने सुद्धा त्यांच्या कष्टाची दखल घेत या खऱ्या हिरोंसाठी बक्षिसे जाहीर केली आहे.

याबाबत जय शाह यांनी ट्विट करत म्हंटल, आमच्या यशस्वी T20 हंगामाचे अनसिंग हिरो हे ग्राउंड स्टाफ आहेत ज्यांनी चमकदार खेळपट्ट्या देण्यासाठी अथक परिश्रम घेतले. तुमच्या या कामाचे कौतुक म्हणून आयपीएलच्या 10 नियमित ठिकाणांवरील ग्राउंड्समन आणि क्युरेटर्सना प्रत्येकी 25 लाख रुपये आणि 3 अतिरिक्त स्थळांवर प्रत्येकी 10 लाख रुपये मिळतील. आपल्या समर्पण आणि कठोर परिश्रमाबद्दल धन्यवाद!

यंदाची आयपीएल मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, चंदीगड, हैदराबाद, बेंगळुरू, लखनौ, अहमदाबाद आणि जयपूर या १० शहरातील स्टेडियमवर खेळवण्यात आली होती तर या वर्षी अतिरिक्त ठिकाणे गुवाहाटी, विशाखापट्टणम आणि धर्मशाला अशी होती. राजस्थान रॉयल्ससाठी गुवाहाटी हे दुसरे होम ग्राउंड होते तर विशाखापट्टणमने दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या सामन्यांच्या पहिल्या टप्प्याचे आयोजन केले होते.