सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
मायणी (ता. खटाव) येथील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे आज सातारा जिल्हा व सत्र न्यायाधीशांपुढे शरण आले होते. न्यायालयाने अर्जावर 11 ऑगस्टपर्यंत तात्पुरता जामीन मंजूर केला. पुढील सुनावणी 11 ऑगस्टला होणार आहे.
मायणी येथील मृत भिसे यांची बोगस कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडिबा घुटुगडे (रा. विरळी, ता. माण), महेश पोपट बोराटे (रा. बिदाल, ता. माण) व अज्ञात दोघांवर दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत महादेव पिराजी भिसे यांनी तक्रार दिली होती.
सर्वोच्च न्यायालयाने आमदार गोरेंना जिल्हा व सत्र न्यायालयात शरण जावून जामीन घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज सातारा न्यायालयात शरण आले. तसेच त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. त्यामुळे जिल्हा न्यायालय त्यांच्या अर्जावर काय निर्णय देणार याची उत्सुकता होती. पण, न्यायालयाने त्यांना तात्पुरता जामीन मंजूर केला.