हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मॉर्फ केलेल्या फोटो त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला. भाखळकरांच्या या कृतीचे पडसाद आज विधानसभेत उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी भर सभागृहात मॉर्फ केलेला फोटो दाखवला. तसेच या प्रकरणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यावर अध्यक्षांनी कारवाई करावी, अशी थेट मागणी केली.
आज पार पडलेल्या अधिवेशनाच्या कामकाजावेळी जयंत पाटील यांनी मोबाइलमधील फोटो सभागृहाला दाखवला. राजकीय पक्षांच्या आयटी सेलकडून, कार्यकर्त्यांकडून विरोधकांची खिल्ली उडवण्यासाठी फोटोशॉप केलेल्या फोटोंचा वापर केला जातो. आता हीच पद्धत आमदारांकडून वापरली जात आहे. मॉर्फिंग करणे हे निषेधार्ह आहे. सभागृहातील सदस्य, ज्येष्ठ सदस्यांचे फोटो मॉर्फ करत असतील हे निषेधार्ह आणि गंभीर मुद्दा असल्याचे जयंत पाटील यांनी विधानसभेत म्हटले.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/537749314737377
मॉर्फ केलेला फोटो आपल्या सोशल मीडिया हँडलवर प्रसारित करून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी छगन भुजबळ यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सभागृहातील सदस्यच दुसऱ्या सन्माननीय आणि ज्येष्ठ सदस्यांचा फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर प्रसारित करून ट्रोल करत असेल तर ते योग्य नाही. गृहमंत्री त्यांच्यावर काय कारवाई करणार? असा सवालही जयंत पाटील यांनी केला.
सरस्वती देवीला न मानणारा एकदम ओरिजनल सांता क्लॉज… pic.twitter.com/pUMSkKVfa5
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 21, 2022
जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. संबंधित ट्वीट खरे आहे का आणि संबंधित व्यक्तीने तक्रार केली आहे का हे पाहावे लागेल, असे फडणवीस यांनी म्हटले. मात्र, हा प्रकार योग्य नसून अशा प्रकारचे मॉर्फिंग करणे चुकीचे असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.