हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी विधिमंडळ सभागृहात आपल्या हटके स्टाईलने शिंदे- फडणवीस सरकारला चिमटे काढले यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून सरकार मधील मंत्र्यांना चिमटे काढले. मंत्रिमंडळ विस्तारात मंत्र्यांना मिळालेल्या खात्यावरूनही त्यांनी टोलेबाजी केली . चंद्रकांत दादांना उच्च व तंत्र शिक्षण दिले, गुलाबराव पाटील हे एकमेव ध्रुवतारा राहिले. त्यांचे खाते फक्त कायम ठेवण्यात आले बाकी सर्वांची खाती बदलली. शंभूराज देसाई तुमची किती बाजू घेत होते पण त्यांना राज्य उत्पादन खात मिळाले असं म्हणत जयंत [पाटलांनी डिवचण्याचा प्रयत्न केला.
जयंत पाटील यांनी यावेळी फडणवीस सरकारच्या काळातील एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याचा व्हायरल झालेल्या व्हिडिओ वरूनही फिरकी घेतली. शिवसैनिकांवर होणार अन्याय तुम्हाला त्यावेळी सहन झाला नाही म्हणून तेव्हा तुम्ही राजीनामा दिला. पण बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे याना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचल्यावर महाराष्ट्रातील शिवसैनिकाला ज्या वेदना झाल्या त्या पाहून तुम्हाला कस वाटतंय असा सवाल जयंत पाटील यांनी शिंदेंना केला.
तसेच एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या छायाचित्रात त्यांना तिसऱ्या क्रमांकाच्या रांगेत उभे राहावे लागले. हा महाराष्ट्राचा अवमान आहे. आम्ही तो सहन करणार नाही. खरे तर त्यादिवशीच मुख्यमंत्र्यांनी तेथून बाहेर पडायला हवे होते, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
यावेळी जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील, असे अनेकांना वाटत होते. खरे तर ते भविष्यात देशाचे पंतप्रधान होतील, अशी भविष्यवाणी अनेकजण आतापासूनच करत आहेत. मात्र त्यांना सीएम इन वेटिंग राहावे लागले आहे, अशी कोपरखळी जयंत पाटील यांनी मारली. ज्या नेत्याला पंतप्रधान होण्याचा योग येऊ शकतो त्या नेत्याला उपमुख्यमंत्री करून भाजपने महाराष्टचा अपमान केला आहे असा टोला त्यांनी लगावला.