हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| माजी भारतीय क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरने (Gautam Gambhir) राजकारणातून निवृत्ती जाहीर केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुख्य म्हणजे, गौतम गंभीरनंतर भाजपचा आणखीन बडा नेता राजकारणातून संन्यास घेण्याच्या वाटेवर असल्याचे समोर आले आहे. भाजप नेते आणि हजारीबागचे खासदार जयंत सिन्हा (Jayant Sinha) यांनी भाजप पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहीत निवडणुकीच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली आहे. या संबंधित त्यांनी एक ट्विट देखील केले आहे.
नुकतेच खासदार जयंत सिन्हा यांनी X या सोशल मीडिया माध्यमावर एक ट्विट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “मी पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना विनंती केली आहे की त्यांनी मला माझ्या थेट निवडणूक कर्तव्यातून मुक्त करावे, जेणेकरून मी भारत आणि जगभरातील जागतिक हवामान बदलाशी लढण्यासाठी माझे प्रयत्न केंद्रित करू शकेल. अर्थात, आर्थिक आणि प्रशासनाच्या मुद्द्यांवर मी पक्षासोबत काम करत राहील.”
तसेच, “गेल्या 10 वर्षांपासून मला भारत आणि हजारीबागच्या जनतेची सेवा करण्याचे भाग्य मिळाले. शिवाय, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माननीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेल्या अनेक संधींचा मला फायदा झाला. त्यामुळे मी या सर्वांचे मनापासून आभार मानतो” असे जयंत सिन्हा यांनी म्हटले आहे.
दरम्यान, जयंत सिन्हा हे माजी केंद्रीय मंत्री आणि TMC नेते यशवंत सिन्हा यांचे पुत्र आहेत. जयंत सिन्हा पहिल्यांदा 2014 लोकसभेवर निवडून आले होते. पंतप्रधान मोदींच्या पहिल्या कार्यकाळातच त्यांच्याकडे मंत्रीपद देण्यात आले होते. तसेच ते 2016 ते 2019 दरम्यान हवाई वाहतूक राज्यमंत्री देखील राहिले. त्यांनी 2014 ते 2016 दरम्यान अर्थ राज्यमंत्री पदाचे काम पाहिले. मात्र पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या काळात त्यांना कोणतेही मंत्रिपद देण्यात आले नाही.