जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी; भिडे गुरुजींच्या संदर्भामुळे खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे । राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. सदर धमकीवजा संदेशामध्ये संभाजी भिडे गुरुजींचा संदर्भ असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आव्हाड यांनी स्वतः याबाबत एक ट्विट रिट्विट करून माहिती दिली आहे. भिडे गुरुजी आणि मंडळी वाट बघत आहेत तुमची, बाहेर निघू नका घराच्या आता असे म्हणत शाश्वत फडणीस नावाच्या एका ट्विटर हँडल वरून आव्हाड यांना धमकीवजा सूचना केल्याचा स्क्रीनशॉट आव्हाड यांनी रिट्विट केला आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिव आशिष मेटे यांनी याबाबत ट्विट केले आहे. हॅलो महाराष्ट्राने आव्हाड यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता मागील काही दिवसांपासून जितेंद्र आव्हाडांना अशा प्रकारच्या जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे सांगण्यात आले. तसेच सध्या व्हायरल होत असलेल्या एक स्क्रीनशॉट मध्ये शाश्वत फडणीस नावाच्या एका ट्विटर हँडल वरून जितेंद्र आवाहाडांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती मिळाली. याबाबत पोलीस तक्रार करण्याची प्रक्रिया सुरु असून आव्हाड यांना भिडे गुरुजींच्या समर्थकांकडून भीती असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, सदर ट्विट केलेल्या व्यक्तीने आपले अकाउंट आता बंद केले असल्याचे समजत आहे. मात्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांकडून सदर ट्विटर हँडेलचा शोध घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सदरील व्यक्तीस एखाद्या कटाची माहिती असू शकते तेव्हा त्याला अटक करून चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”