हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कडक शब्दात समाचार घेतला आहे. बंडा तात्या कराडकर हे खरे वारकरी आहेत की नाही हे तपासून पाहण्याची गरज आहे असं आव्हाड म्हणाले.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, एका किर्तनकाराच्या तोंडी अशी भाषा येणं म्हणजे तो किर्तनकार आहे की नाही हा प्रश्न उभा राहतो. बंडातात्या कराडकर, यांची मुळं कुठे आहेत, हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. ते त्यांच्या संस्काराप्रमाणे बोलले. यात मनावर घेण्यासारखं काही नाही.
पंकजा ताई असो किंवा सुप्रियाताई असो..एका किर्तनकाराने महिलांवर घसरावं ही महाराष्ट्राची आणि वारकऱ्यांची संस्कृती नाही. त्यामुळे ते खरे वारकरी आहेत की नाही हे तपासून पाहण्याची फार पूर्वीपासून गरज होती. आता त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून महाराष्ट्राला सिद्ध करून दिलं की ते कोण आहेत”, असं देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले.
बंडातात्या नेमकं काय म्हणाले-
हभप बंडातात्या कराडकर यांनी सकाळी सकाळी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर दारु पिण्याचे आरोप केले. या सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे या दारुपिऊन रस्त्यावर नाचतात असा आरोप बंडातात्या यांनी केला. सुप्रिया सुळे दारुपिऊन रस्त्यावर पडल्याचे फोटो तुम्हाला ढिगाने मिळतील. राजकारणात येण्याआधी त्या दारुपिऊन पडत होत्या. सुप्रिया सुळे यांनी सांगावं की बंडातात्या खोटं बोलतायत”, असं बंड्यातात्या म्हणाले.