व्हॉईस ऑफ मिडीयाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी पत्रकार विशाल पाटील यांची नियुक्ती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
महाराष्ट्रातील पत्रकारांचा बुलंद आवाज म्हणून व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेचे नाव घेतले जाते. राज्यात पत्रकार आणि पत्रकारितेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि हितासाठी प्रामुख्याने कार्यरत असणाऱ्या या संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी पत्रकार व हॅलो महाराष्ट्रचे प्रतिनिधी विशाल वामनराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे आणि पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अभयकुमार देशमुख यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

व्हाईस ऑफ मीडिया ही 50 ज्येष्ठ संपादकांनी एकत्र येऊन पत्रकारिता आणि पत्रकारांच्या कल्याणासाठी निर्माण केलेली संघटना असून भारतातील 17 राज्यांमध्ये ही संघटना कार्यरत आहे. कोरोनाकाळात 136 पत्रकारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ‘व्हाईस ऑफ मीडिया’ने या 136 पत्रकारांच्या 150 पाल्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करून त्यांना मोठा आधार देण्याचे काम केले. पत्रकारांची हीत जपणारी संघटना म्हणून व्हॉईस ऑफ मिडीयाकडे पाहिले जाते. राजकारणामध्ये न अडकता पत्रकारिता आणि पत्रकारांना सक्षम करण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून घडत आहे. पत्रकारांना त्यांची स्वतःची घरे उपलब्ध करून देणे, पत्रकारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, आजारपण, अपघात किंवा इतर संकटकाळी पत्रकारांना आधार देण्याचे कार्य ही संघटना करीत आहे.

या संघटनेच्या सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, पाटण, कोरेगाव, खटाव, माण, फलटण, खंडाळा, वाई, महाबळेश्वर, जावली या 11 तालुक्यातील तालुका स्तरावरील निवडी लवकरच पार पडणार असल्याचे सातारा जिल्ह्याचे नवनियुक्त अध्यक्ष विशाल पाटील यांनी सांगितले