हिंगोली प्रतिनिधी । कळमनुरी तालुक्यातील लासिना येथे हुंड्याच्या रकमेच्या वादातून जावयाने आपल्या सख्ख्या मेव्हण्याचा गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संतोष शंकर डांगे (१४) असं मयत मेव्हण्याचे नाव असून तात्याराव जगदेवराव सूर्यवंशी असं आरोपी जावयाचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २ डिसेंबर रोजी आरोपी तात्यारावने मयत संतोषला जुन्या बस्थानकावर गाठत त्याला क्रूझर जीपने शेंबळा पिंपरीत नेलं. याठिकाणी तात्यारावनं संतोषाला चांगलं खाऊपिऊ घातलं. त्यानंतर तात्यारावने शेंबळा पिंपरीवरून क्रूझर मुळवा, उमरखेड रस्त्याकडं वळवली. अचानक रस्त्यात जीप थांबवत मागे-पुढे कोणी नसल्याची संधी साधत तात्यारावने संतोषचा गळा आवळला. संतोष मृत झाल्याची खात्री होताच रस्त्याच्या कडेला केबलसाठी खोदलेल्या खड्ड्यात तात्यारावने संतोषाचा मृतदेह पुरवला.
तर तिकडे आपला मुलगा अजून घरी पोहचला नसल्याने त्याच्या अपहरणाची तक्रार संतोषचे वडील शंकर डांगे यांनी पोलिसांत दिली. दरम्यान, दुसऱ्या दिवशी ३ डिसेंबरला संतोषचा मृतदेह स्थानिक शेतकऱ्यांना आढळला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची ओळख पटवत याबाबत शंकर डांगे यांना कळवले. पोलिसांनी शंकर डांगे यांना कुणावर संशय असल्याचे विचारले असता त्यांनी जावई तात्यारावचे नाव घेतले. पोलिसांनी लगेच तात्यारावला ताब्यात घेऊन चौकशी केली असता पोलिसी ख्याक्या दाखवताच तात्यारावने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली तसेच या खुनात कैलास सूर्यवंशी हा सुद्धा सहभागी असल्याचे सांगितलं. पोलिसांनी तात्यारावला ५ डिसेंबरला न्यायालयात उभे केलं असता न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी दोघांना सुनावली आहे. सदर खून प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत.