महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करताना कंगनाची जीभ घसरली; एकेरी भाषेत उल्लेख करत म्हणाली..

मुंबई । गेल्या ८ दिवसांपासून अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेत सुरू असलेला वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. कंगनानं मुंबईत येताच एक ट्विट करून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. कंगनाने आपल्या घरी पोहोचताच एक व्हिडिओ ट्विट केलाय. यात तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला आहे. ‘उद्धव ठाकरे आज तू माझं घर तोडलं आहे, उद्या तुझं गर्वहरण झाल्याशिवाय राहणार नाही’ असं कंगनानं म्हटलं आहे.

कंगना व्हिडिओत म्हणाली कि, ‘उद्धव ठाकरे तुला काय वाटतं…फिल्म माफियांसोबत मिळून तू माझं घर तोडलं आणि मोठा बदला घेतलाय. आज माझं घर तुटलं आहे, उद्या तुझं गर्वहरण होईल. वेळेचं चक्र आहे, कोणासाठीही नेहमी सारखं राहत नाही हे लक्षात ठेवा. पण तू माझ्यावर उपकार केले आहेत असंच मी समजेन. काश्मिरी पंडितांना कसं वाटतं याची जाणीव मला आज झाली. मी या देशाला वचन देतेय की, मी केवळ अयोध्या नाही तर काश्मीरवरही सिनेमा बनवेन. आपल्या देशातील नागरिकांना जागरुक करणार. ही क्रूरता माझ्यासोबत घडली हे चांगलं आहे, कारण याला देखील एक अर्थ आहे. जय हिंद…जय महाराष्ट्र.’

दरम्यान, कंगना रानौत मुंबई विमानतळावर येत असल्याने भारतीय कामगार सेनेने मुंबई विमानतळावर आंदोलन केले. या आंदोलनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आंदोलन न करण्याची सूचना देवूनही आंदोलन केलं गेल्यानं, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी दर्शवल्याची सूत्रांची माहिती आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like