कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी वरदान ठरलेल्या कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये आज कोरोनामुक्तीचे सहस्त्रक पूर्ण झाले. कृष्णा हॉस्पिटलमधून आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या 45 कोरोनामुक्त रूग्णांमुळे येथील कोरोनामुक्तीचा आकडा आज 1012 इतका झाला आहे. कोरोनामुक्तीच्या लढ्यात कृष्णा हॉस्पिटलने दिलेल्या या अथक वैद्यकीय सेवेचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा मोठा कहर सुरु आहे. मोठ्या संख्येने कोरोना बाधित रूग्ण वाढत असतानाच कृष्णा हॉस्पिटलने कोरोनामुक्तीसाठी दिलेले योगदान अभूतपूर्व ठरत आहे. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वॉर्डमध्ये सुरू झालेल्या उपचारांमुळे 18 एप्रिल रोजी पहिल्या कोरोनामुक्त रूग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीची मालिकाच सुरू झाली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या यशस्वी निगरानीखाली दिवसेंदिवस कोरोनामुक्तीचा आकडा वाढत, आज कृष्णा हॉस्पिटलने कोरोनामुक्तीचे सहस्त्रक पूर्ण करत 1012 इतका आकडा पार केला आहे.
आज 45 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्जार्च देण्यात आला. कोरोनामुक्तीची ही लढाई जिंकलेल्या रूग्णांचा सत्कार कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रवीण शिनगारे, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. संजय पाटील, डॉ. एस. आर. पाटील, डॉ. विनायक राजे, कविता कापूरकर, मनसेचे दादा शिंगण व प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आला.
सध्या कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्यामुळे रूग्णसंख्येमध्ये मोठी वाढ होत आहे. अशावेळी जास्तीत जास्त कोरोनाबाधित रूग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी कृष्णा हॅस्पिटलने सर्व सज्जता ठेवली आहे. लक्षणे जाणवताच कोरोनाची चाचणी करून, तातडीने उपचार घेतल्यास रूग्ण बरा होऊ शकता. यासाठी सर्वांनी लक्षणांकडे दूर्लक्ष न करता लवकरात लवकर उपचार घ्यावेत, असे आवाहन डॉ. सुरेश भोसले यांनी यावेळी केले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”