कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
नवरात्रोत्सवात विशेषतः महिलांनी काळजी घेवून सहभाग व्हावी. दागदागिने सांभाळून व घराबाहेर पडताना खबरदारी घेवून बाहेर पडावे. याकाळात बंद घरे चोरटे लक्ष करतात, तसेच सोन्यांच्या दागदागिण्यांवर डल्ला मारला जातो., तेव्हा नागरिकांनी व महिलांनी विशेष खबरदारी घ्यावी. महिलांच्याबाबत कोणतेही चुकीचे प्रकार झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा हुल्लडबाजांना कराड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी दिला आहे.
कराड येथील पोलिस भवन येथे कराड शहर पोलिस ठाण्यातील हद्दीतील मंडळाचे कार्यकर्ते व शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वाहतूक पोलिस शाखेच्या सरोजिनी पाटील, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब ढेब, मनसेचे दादासाहेब शिंगण, केदार डोईफोडे, अॅड. विद्याराणी सांळुखे, विद्या मोरे यांच्यासह पोलिस कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते व नवरात्र उत्सव मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बी. आर. पाटील म्हणाले, उत्सवात निर्बंध उठले म्हणजे सैराचार नव्हे. या उत्सवाच्या अनुषंगाने कायदा, सुव्यवस्था जपणे महत्वाचे आहे. या काळात नऊ दिवस उपवास असतात. विशेषतः महिला वर्ग पहाटे दर्शनासाठी जात असतात. कोरोनानंतर येणारा हा उत्सव उल्हासित वातावरणात साजरा होईल. महिलांची सुरक्षितता, दागिण्यांची सुरक्षितता, छेडछाडीचे प्रकार घडू नयेत, म्हणून साध्या वेशातील पोलिस, फिक्स पाॅंईट, रस्ते पथके तयार करण्यात आली आहेत. मंडळांना चार नोटीसा देवून सूचना दिलेल्या आहेत.