कराड प्रतिनिधी । संतोष गुरव
गेल्या चार दिवसापासून सातारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. दोन दिवसांपूर्वी पावसाने ढेबेवाडी परिसरात अनेक घरांचे पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले होते. आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कराड शहरात अचानक आलेल्या मुसळधार पाऊसाने हाहाकार माजवला. सोसाट्याच्या वार्याने क्षणार्धात होत्याचं नव्हतं केलं. यामध्ये कराड विटा महामार्गावर मोठी झाडे कोसळून वाहतुक ठप्प झाली आहे. तसेच एका टेम्पोवर झाड पडतानाचा प्रसंगाची लाईव्ह दृष्य हॅलो महाराष्ट्रने घेतली आहेत. यावेळी एका कारवरच झाडाची फांदी पडल्याने मोठा अपघात झाला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, दिवसभर कराड शहरातील वातावरण सर्वसाधारण होते. मात्र अचानक संध्याकाळी चार वाजेच्या दरम्यान वादळी वारे आले. त्यानंतर काहीच क्षणात मुसळधार पाऊस सुरु झाला. यावेळी वार्याचा वेग इतका जोरदार होता की शहरातील काॅटेज हाॅस्पिटल समोरील एक भले मोठे झाड पाहता पाहता रस्त्यावर कोसळले. यामध्ये एका कारच्या (गाडी क्रमांक MH50 A4486) टपावरच मोठ्या झाडाची फांदी कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. तसेच टेम्पोवर झाड पडल्याने टेम्पोचेही नुकसान झाले आहे.
दोन्ही वाहनांतील चालक वेळीच बाहेर पडल्याने जीवितहानी झालेली नाही. तसेच कराड – विटा मार्गावर अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतुक ठप्प झाली आहे. शहरातील वीजपुरवठा खंडीत झाला असून पावसामुळे शहरातही मोठे नुकसान झाले आहे.
या दरम्यान कराड शहरातील प्रशासकीय इमारत परिसरात पंचायत समिती व रेव्हेन्यू क्लब समोर असलेला मोठा लाईट पोल अचानक पडला. तर त्या लगतचे झाड कोसळले. त्यामुळे तेथील वीज पुरवठाही खंडित झाला आहे. अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्यामुळे शहरातील रस्त्यांवर वृक्षांच्या फांद्या पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
कराड शहरातून गेलेल्या सातारा पंढरपूर मार्गावर ठिकठिकाणी झाड कोसळल्याने हा मार्ग सुमारे दोन तास ठप्प होता. तसेच पावसामुळे वाहतूक ठप्प झाल्याने कृष्णा नदीवरील पुलावरील वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
कराडातील कृष्णा पूल रस्ता झाला बंद…
प्रचंड वादळी वाऱ्यासह शहर व परिसरात झालेल्या पावसाने एकच दाणादाण उडाली आहे. कराड शहरात कृष्णा फुलाकडे जाणारा रस्ता बंद झाला असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पुलावरून कराडकडे येणारी वाहतूक पुलापासून मंगळवार पेठतून वळविण्यात आलु आहे या रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेक वाहनं पाण्यात अडकली असून वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.