कर्नाटकात भाजपला ‘या’ चुका महागात पडल्या; पहा पराभवाची 5 कारणे

_reasons behind bjp failure in karnataka
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।कर्नाटक विधानसभा निवडुकीचे निकाल आज जाहीर होत आहे. कर्नाटकात यंदा काँग्रेसने जोरदार कमबॅक करत सत्ता काबीज केली आहे. आत्तापर्यंतचे कल पाहता कर्नाटक मध्ये काँग्रेस १३० जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप अवघ्या ६५ जागांवर आघाडीवर आहे. JDS २१ आणि इतर ६ जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे कर्नाटकात काँग्रेस एकहाती सत्तेत येण्याची चिन्हे आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रचार सभांचा धडाका लावूनही भाजपला आपली सत्ता टिकवता आली नाही. कर्नाटकात भाजपचा पराभव नेमका कसा झाला याची नेमकी कारणे आपण जाणून घेऊया …

1) भाजपकडे मजूबत चेहराच नव्हता –

कर्नाटक निवडणुकीत भाजपचा पराभव होण्याचे मुख्य कारण म्हणजे पक्षाकडे असा चेहराच नव्हता कि ज्याच्याकडे बघून लोक भाजपच्या पारड्यात मतदान करतील. भाजपने बीएस येडियुरप्पा यांच्या जागी बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री बनवले असेल, पण मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर असतानाही बोम्मई यांना लोकांवर छाप पाडता आली नाही. जनतेमध्ये ते अपयशी ठरले. याउलट दुसरीकडे काँग्रेसकडे मात्र डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यासारखे मुरलेले आणि सक्षम असे नेते होते. याचा फटका भाजपला बसला.

2) राजकीय समीकरण साधण्यात अपयश

कर्नाटकात जातीय समीकरण राखण्यात आणि फायदा घेण्यात भाजपला अपयश आले. कर्नाटकातील लिंगायत समाज हा भाजपचा मुख्य मतदार होता, परंतु या समाजाची अपेक्षित मते भाजपला मिळवता आली नाहीत. तसेच दलित, आदिवासी, ओबीसी आणि वोक्कलिंगा समाजावर सुद्धा छाप पाडता आली नाही. तर दुसरीकडे काँग्रेसने मात्र सर्व समाज घटकांची मने जिंकली. आणि मते मिळवण्यात यश प्राप्त केलं.

3) भ्रष्ट्राचाराचे आरोप

लोकांना भ्रष्ट्राचाराचा सर्वात जास्त राग येतो. कर्नाटकातील बोम्मई सरकारवर भ्रष्ट्राचाराचे आरोप झाले होते. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरच ईश्वरप्पा यांना मंत्रिपदावरुन राजीनामा द्यावा लागला होता. त्यातच काँग्रेसने सुरुवातीपासूनच ४० टक्के-सीएम करप्शन असा अजेंडा राबवला होता. याचा संपूर्ण परिणाम कर्नाटकच्या निकालावर झाला.

4) भाकरी फिरवणे महागात पडलं –

कर्नाटकात भाजपने भाकरी फिरवत अनेक मोठया नेत्यांची तिकिटे कापली, याचा फटका भाजपला बसला. ज्या येडियुरप्पा यांनी आत्तापर्यन्त सातत्याने कर्नाटकात भाजपचे कमळ फुलवलं त्यांना भाजपने या निवडणुकीत साईडलाईन केलं. तसेच माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी या दिग्गज नेत्यांची तिकिटे कापली, त्यानंतर हे दोन्ही नेते काँग्रेसमध्ये गेले आणि भाजपला मोठा फटका बसला. शेट्टर आणि सवदी हे दोघेही लिंगायत समाजाचे बडे नेते आहेत, त्यामुळे लिंगायत समाजाचा रोष भाजपला सहन करावा लागला.

5) ध्रुवीकरण फसलं

कर्नाटकात धार्मिक ध्रुवीकरणाचे भाजपचे गणित फसलं. भाजपचे नेते गेल्या वर्षभरापासून हलाल, हिजाब या मुद्द्यांवरुन आवाज उठवत होते. यंदाच्या निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा बजरंगबलीची एन्ट्री झाली परंतु धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. भाजपचे हिंदुत्वाचे कार्ड कर्नाटकात फेल गेलं.