हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाण्याचे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ हा मराठी चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवरही बक्कळ कमाईही केली. या चित्रपटाबाबत अनेक राजकीय नेत्यांनी मत व्यक्त केल्यानंतर आता आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी चित्रपटाबाबत एक मोठं विधान केलं आहे. ‘धर्मवीर’ हा व्यावसायिक चित्रपट आहे, असे दिघे यांनी म्हटले आहे.
केदार दिघे यांनी आज शिर्डी येथे जाऊन साईबाबांचं दर्शन घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपट हा बनवण्यात आलेला आहे. हा एक व्यावसायिक चित्रपट आहे. दिघेसाहेब हे केवळ तीन-चार जणांमध्येच वावरले नाहीत. केवळ त्यांच्याच आयुष्यात काहीतरी बदल घडावा, म्हणून त्यांनी काम केले नाही. संपूर्ण महाराष्ट्रात दिघेसाहेबांचे असंख्य चाहते आहेत. दिघेसाहेबांमुळे किंवा त्यांनी केवळ जवळ घेतल्यामुळे अनेकांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडला आहे.
दिघे साहेबांचा चित्रपट हा केवळ तीन तासांचा असू शकत नाही. त्यांचं जीवनपट रेखाटायचं असेल तर ‘सीरीज ऑफ इव्हेंट’ करावे लागतील. मला वाटतं ते सत्यात असावेत. अनेक जणांनी खऱ्या अर्थाने दिघे साहेबांच्या आयुष्यात मोठा नसेल, पण खारीचा वाटा म्हणून काम केले आहे. साहेबांबरोबर ते राहिलेले आहेत, असे केदार दिघे यांनी म्हंटले.