केरळ विजयाच्या उंबरठ्यावर! ४९९ पैकी ४६५ कोरोनाबाधित झाले बरे; एकही नवा रुग्ण नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

तिरुअनंतपुरम । देशात कोरोनाने सर्वात आधी ज्या राज्यातून घुसखोरी केली होती ते राज्य म्हणजे केरळ. मात्र, आता केरळ कोरोनाच्या लढाईत विजयाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलं आहे. केरळ लवकरच या विषाणुला राज्यातून हद्दपार करणार असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे. आता केरळमध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असून, गेल्या काही दिवसांत एकही कोरोनाचा नवीन रुग्ण आढळलेला नाही. विशेष म्हणजे ४९९ पैकी ४६५ जण ठणठणीत बरे होऊन पुन्हा घरी परतले आहे.

सोमवारी (४ एप्रिल) केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील करोनाविषयीच्या स्थितीची माहिती दिली. केरळमध्ये एकही नवीन करोनाग्रस्त रुग्ण सापडला नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर राज्यात ४९९ जणांना करोनाची लागण झाली होती. त्यापैकी फक्त ३४ जणच सध्या उपचार घेत आहे, असं मुख्यमंत्री विजयन यांनी सांगितलं. केरळ सरकारच्या उपाय योजनांमुळे तब्बल ४६५ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. केरळनं कोरोनाविरोधात दिलेला लढा यशस्वी ठरला आहे.

देशात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण केरळमध्ये सापडला होता. कोरोनाचा शिरकाव झाल्याचं लक्षात येताच केरळ सरकारनं या विषाणू विरुद्ध कंबर कसली. लॉकडाउनच्या काळात केरळ सरकारनं केलेल्या उपाययोजना चांगल्याच प्रभावी ठरल्या. केरळमध्ये आता करोना बाधित रुग्णांची संख्या शेकड्यावरून चाळीशीच्या आत आली आहे. देशातील अन्य राज्यांमध्ये करोनाग्रस्तांची संख्या रोज वाढतेय पण केरळमध्ये आता कोरोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण आता शून्य झालं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”