वाई | सातारा-पुणे महामार्गावरील खंबाटकी बोगद्याजवळ टेम्पोचालकाचा ताबा सुटल्याने दुचाकीवरून खाली पडलेल्या महिलेच्या अंगावरून टेम्पोची चाके जावून जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत सरिता महेश पवार (वय- 40) यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अंकुश मोतीराम जाधव (वय-25), सुगंधा दशरथ वाघे (वय- 50) सरिता रमेश पवार (वय- 40, रा. शिरवळ, ता. खंडाळा) असे तिघेजण दुचाकीवरुन वेळे येथे ओढ्याच्या पात्रात मासे पकडण्यासाठी गेले होते. सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास पकडलेले मासे विक्री करण्यासाठी पुन्हा शिरवळकडे जात होते. खंबाटकी बोगदा पास करुन एस कॉर्नरजवळ असणाऱ्या धोम बलकवडी कालव्याजवळ यांची दुचाकी आली.
तिला पाठीमागून भरघाव वेगात येणाऱ्या टेम्पो क्र (एमएच- 11 ऐ.एल.359) याने जोराची धडक दिल्याने तिघेही दुचाकीस्वार महामार्गावर कोसळले. त्यावेळी सरिता रमेश पवार (वय-40) यांच्या अंगावरुन टेम्पोची चाके गेल्याने त्यांचे शरीराच्या काही भागाचे तुकटे झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
या भीषण अपघाताची माहिती खंडाळा पोलिसांना मिळताच खंडाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश कुमार इंगळे, पीएसआय पांगारे, हवालदार गिरीष भोईटे, तुषार कुंभार असे सर्वजण अपघातस्थळावर दाखल झाले आणि अपघातात छिन्नविछिन्न अवस्थेत महामार्गावर पडलेला महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी खंडाळा येथील शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.