सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार महेश शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे केवळ पाच दिवसांत सातारा शहरानजीकच्या खेड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा दिला आहे. या संदर्भात राज्य सरकारने अधिसूचना केली आहे. या निर्णयामुळे खेड येथे फटाक्यांची अतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला.
मागील आठवड्यात आमदार शिंदे यांनी खेडला नगरपंचायतीचा दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न केले होते. सातारा जिल्हा परिषदेकडून त्या स्वरूपाचा ठराव देखील करून घेतला होता. नगरविकास मंत्रालय हे एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने आणि आमदार शिंदे हे त्यांचे निकटवर्तीय आमदार असल्याने मंत्रालयात जिल्हा परिषद पोहोचतात. अवघ्या पाचच दिवसात खेडला नगरपंचायत दर्जा मिळाला हा दर्जा मिळाल्याने आता महानगराच्या धर्तीवर कोरेगाव शहरासारखे चांगले दर्जेदार रिमिक्स काँक्रिटीकरण रस्ते भुयारी गटार योजना मिळणार आहेत.
खेडच्या विकासाचा मार्ग खुला – आ. महेश शिंदे
खेड हे महामार्गालगतचे मोठे गाव आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे ग्रामपंचायतीला विकासकामे करताना कसरत करावी लागत होती. वैद्यकीय महाविद्यालय, सातारा शहर शेजारी अन् उद्योग धंदे यामुळे खेड हे विकासाकडे वाटचाल करत आहे. सरकारने केवळ पाच दिवसांत नगरपंचायतीचा दर्जा देण्याची घोषणा केल्याने आता खेडच्या विकासाचा मार्ग खुला झाला असल्याचेही आमदार महेश शिंदे यांनी सांगितले.