खिंडवाडीतील खून उघडकीस : दगड खाणीत मित्रांनीच केला मित्राचा खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीतील खिंडवाडी येथील दगडाच्या खाणीत रविवार दि. 21 रोजी एक पुरुष जातीचे प्रेत सापडले होते. सदरील मयत अमोल डोंगरे (वय- 35, रा. बीड जिल्हा) याला त्याच्याच दोन मित्रांनी डोक्यात टाॅमीने मारहाण करून खून केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पुणे व कर्नाटक राज्यातून सातारा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

खूनप्रकरणी सुनिल रखमाजी डोंगरे (वय- 33, रा. पिंपरी चिंचवड- पुणे), मधुकर सोमजी सोनावणे (वय- 51, रा. कोटरबन, ता. वडवणी, जि. बीड) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा येथील खिंडवाडीत दगडाच्या खाणीत दि. 21 रोजी 35 वर्षीय पुरूषाचे प्रेत सापडले होते. सदर इसमाचे डोक्याचे मागील बाजुस जोराचा मार लागलेला दिसत होता. सदर इसमाचे अंगावर कपडे नव्हते व त्याचे हातावर अमोल के असे गोंदलेले दिसत होते. मयताचे आसपास तपासणी केली असता इतर काही एक पुरावा मिळुन येत नव्हता. सदर इसमास मारहाण झाल्याने तो मयत झाला असल्याचे पोलीसांना संशय होता. सदर मयताचे नाव निष्पन्न करुन त्याची ओळख पटवणे हेच आव्हान पोलीसासमोर उभे होते. अशावेळी सदर मयताचा तपास करुन मयताचे नाव निष्पन्न करण्यासाठी पो.नि. श्री. निंबाळकर यांनी पुणे शहर येथे पुणे ग्रामीण कंट्रोल, कोल्हापुर व सांगली येथील कंट्रोलला पोलिस कर्मचाऱ्यांना पाठविले होते. सर्व अमंलदार एकाच वेळी सर्व जिल्हयात माहिती घेत होते.

पोलिस माहिती घेत असताना पुणे ग्रामीण येथे रवाना झालेले पथकातील कर्मचारी पोना. 2270 माने व पोशि. 399 घुमाळ यांना माहिती मिळाली की, सिंहगड पोलीस ठाणे येथे मिसींग तक्रार 18 नोव्हेंबर रोजी दाखल आहे. अशी माहिती मिळाल्याने तात्काळ पोलीस त्यांनी तक्रारीची दाखल घेतली. सदरची माहिती मिळाल्याने तात्काळ पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. कदम व पोना. 2186 ढाणे हे पुणे येथे रवाना झाले. पुणे येथे जावून तपास करीत असताना मयत व्यक्ती निष्पन्न झाली.

अधिक तपासादरम्यान मयत व्यक्तीचा खून सुनिल डोंगरे, मधुकर सोनावणे यांनी केला असल्याचे निष्पन्न झाले. परंतु आरोपी सुनिल डोंगरे हा पुणे येथे होता तर दुसरा आरोपी कर्नाटक राज्यात असले बाबत माहिती प्राप्त झाली. तेव्हा पोलीसांनी कर्नाटक राज्यात जावून आरोपी मधुकर सोमाजी सोनावणे यास ताब्यात घेतले.

सदर कारवाईमध्ये पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक अजय बोऱ्हाडे, सहा पोलीस अधिक्षक आंचल दलाल, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, पोलीस निरीक्षक श्रीमती वंदना श्रीसुंदर यांचे मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाणे डी. बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख, पो.ना. सुजित भोसले, अविनाश चव्हाण, पंकज ढाणे, ज्योतीराम पवार, अभय साबळे, पो.कॉ. संतोष कचरे, गणेश घाडगे, विशाल धुमाळ, सागर गायकवाड, विक्रम माने यांनी सहभाग घेतला.

लोखंडी टाॅमीने मारहाण करून खून

दरम्यान पुणे येथुन ताब्यात घेतलेला आरोपी सुनिल डोंगरे याचेकडे तपास केला असता त्याने त्याचा मित्र अमोल डोंगरे यास सातारा येथील खिंडवाडी येथे असलेल्या दगडाच्या खाणीमध्ये नेवुन डोक्यात लोखंडी टॉमीने मारहाण करुन त्याचा खून केला असल्याचे सांगितले. सदरचे दोन्ही आरोपी अटक केले आहेत. सदर दोन्ही आरोपीना अटक करुन त्यांची पोलीस कोठडी घेण्यात आलेली आहे. आरोपीनी खून का केला याबाबत पोलीस कोठडीमध्ये अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख हे करीत आहेत.