चळवळ म्हणजे एक प्रकारचा वाघ, वाघावर स्वार होणं सोपं असतं. पण…; राजू शेट्टींचा खोतांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | परिवहनमंत्री अनिल परब यांनी काल एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याची घोषणा केल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर व शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी आंदोलनातून तात्पुरती माघार घेत असल्याचे जाहीर केले. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी खोत यांना टोला लगावला आहे. “चळवळ म्हणजे एक प्रकारचा वाघ आहे. वाघावर स्वार होणं सोपं असतं. पण एकदा स्वार होऊन परत पायउतार होणं अवघड. अन्यथा वाघ स्वार होणाऱ्यालाच खाऊन टाकतो, अशा शब्दात शेट्टी यांनी खोत यांना टोला लगावला आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी नाशिक येथे आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर व शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, एसटीचं आंदोलन आणि शेतकरी आंदोलन यामध्ये खूप फरक आहे. वास्तविक खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात गृहपाठ न केल्यामुळे त्यांना तोंडघशी पडावे लागले. चळवळ म्हणजे एक प्रकारचा वाघ आहे. वाघावर स्वार होणं सोपं असतं. पण एकदा स्वार होऊन परत पायउतार होणं अवघड. अन्यथा वाघ स्वार होणाऱ्यालाच खाऊन टाकतो, हि गोष्ट खोत यांनी लक्षात घ्यावी.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्यावर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या मुद्यांवरून निशाणा साधला आहे. शेट्टी यांच्या टोलेबाजीवर आता सदाभाऊ खोत काय उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

You might also like