साताऱ्यात 9 हजारासाठी अल्पवयीन मुलाचे अपहरण

सातारा | पाडळी (ता. सातारा) येथून एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी गावातीलच शिवेंद्र राजेंद्र ढाणे या युवकाला अवघ्या चार तासातच बोरगाव पोलिसांनी अटक केली. त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

याबाबत मिळालेली माहिती अशी, पाडळी येथील अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलगा हा आईसोबत पाडळी येथे रहावयास आहे. या मुलाच्या भावावर सन 2021 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी गावातीलच शिवेंद्र राजेंद्र ढाणे याचे वडील जामीन झाले होते. त्यांनी जामिनासाठी 5 हजार रुपये भरले होते. आता 5 हजार रुपयांऐवजी 9 हजार रुपये परत द्यावे, यासाठी शिवेंद्र ढाणे हा या कुटुंबाला वारंवार धमकी देत होता.

शुक्रवारी सकाळी पीडित मुलाची आई रानात गेली असताना  फोन करून जामिनासाठी भरलेले पैसे परत दे नाहीतर तुझ्या मुलाला उचलून घेऊन जाऊन त्याला जीवे मारीन अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने अल्पवयीन मुलाला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून त्याला सातारा येथील शिवराज पेट्रोल पंप आणि करंजे (सातारा) येथे त्याला मारहाण केली.

सायंकाळी उशिरा शिवेंद्र याच्या तावडीतून मुलाने स्वतःची सुटका करून घेत शिवराज पेट्रोल पंप गाठले. तेथून त्याने चुलत भावाला फोन करून सर्व घटना सांगितली. चुलत भावाने तात्काळ त्याला तेथून घेऊन बोरगाव पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना घटनाक्रम सांगून गुन्हा दाखल केला. यावेळी सपोनि डॉ. सागर वाघ यांनी पोलिस जवान दादा स्वामी व प्रशांत मोरे यांना संशयिताला ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. खबऱ्यांच्या माहितीच्या आधारे या दोघांनी शिवेंद्र याला खिंडवाडी येथून अवघ्या चार तासातच अटक केली.