धक्कादायक! मुंबईवरून पायी गावी निघालेल्या अल्पवयीन मुलीचे वाटेतच अपहरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव । कोरोनाच्या पार्शवभूमीवर शहरात हाताला काम नसल्याने मुंबईहून अकोल्याकडे पायी निघालेल्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीला लिफ्ट देण्याचा बहाणा करुन अपहरण केल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. या घटनेत अज्ञात तरुणाच्या विरोधात भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता अपहरण केलेल्या मुलीचा आणि तिला पळवून नेणाऱ्या तरुणाचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मुंबईतील मुलुंड परिसरात मजुरी करुन आपला उदरनिर्वाह करणारे एक कुटुंब कधी पायी तर कधी मिळेल त्या वाहनाने अकोल्याकडे निघाले होते. दरम्यान, पायी जात असलेल्या या कुटुंबाला नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दुचाकीस्वार तरुणाने लिफ्ट देण्याची तयारी दाखवली होती. ऐन दुपारच्या उन्हाची वेळ असल्याने संबंधित कुटुंबातील १७ वर्षांचा मुलगा आणि १३ वर्षीय मुलगी दुचाकीवर बसून पुढच्या प्रवासाला निघाली होती. काही किलोमीटर अंतरावर गेल्यावर तरुणाने मुलीच्या भावास पुढे पोलीस असल्याचा बहाणा करुन उतरण्यास सांगितले. त्यानंतर पोलिसांची गाडी गेल्यावर पुन्हा गाडीवर बसून जाऊ, आम्ही पुढे थांबतो, असे सांगितले.

पीडित अल्पवयीन मुलीच्या भावाने यावर विश्वास ठेवला आणि तो गाडीवरुन उतरुन पायी चालू लागला. मात्र बरंच अंतर पुढे गेल्यावरही आपली बहीण आणि लिफ्ट देणारा तरुण न दिसल्याने भाऊ काळजीत पडला. त्यानंतर याची माहिती त्याने आपल्या आई-वडिलांना सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखून कुटुंबाने संबंधित तरुणाविरोधात भुसावळ पोलीस ठाण्यात तक्रार केली. यानंतर पोलिसांनी अज्ञात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या मुलीचा कसून शोध घेत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”