किसन वीरांच्या गावात शब्द देतो तिन्ही कारखाने, डिस्टिलरी, कोजेन पुर्ण क्षमतेने चालवू : नितीन पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

किसन वीर कारखान्याची आत्ताची अवस्था बघता किसन वीर कारखान्यावर कधीही जप्ती येऊ शकते. एवढा प्रचंड कर्जाचा डोंगर किसन वीर कारखान्यावर मदन भोसले यांनी केला आहे. कारखाना वाचवायचे असेल तर तो फक्त जिल्हा बँकेच्या व सोसायटीच्या मदतीच्या माध्यमातून आम्हीच वाचवू शकतो, मदन भोसलेंचे ते काम नाही. कारखान्याची सत्ता जर सभासदांनी आमच्याकडे सोपविली तर जबाबदारीने तिन्ही कारखाने, डिस्टिलरी, कोजेन पुर्ण क्षमतेने चालवु असा शब्द किसन वीर यांच्या गावात आज मी तुम्हाला देतो, असे प्रतिपादन सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन नितीन पाटील यांनी दिला.

किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कवठे (ता. वाई) येथे झालेल्या जाहीर प्रचारसभेमध्ये केले. यावेळी किसन वीर कारखान्याचे माजी संचालक संदीप पोळ, माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद पोळ, राहुल डेरे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.  नितीन पाटील पुढे म्हणाले, मदन भोसले यांनी गेले तीन वर्षे विविध बँकांची कर्जे थकीत ठेवली आहेत. त्यामुळे पत गेल्याने बँकांनी यांना कर्ज देण्यास नकार दिला आहे. अशावेळी कारखाना जर या संकटातून बाहेर काढायचा असेल तर मी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाला विश्वासात घेऊन, तुम्हाला प्रती शेअर्स 15 हजार रुपयांचा कर्ज पुरवठा सोसायटींच्या माध्यमातून विना किंवा अल्पव्याजामध्ये करेन. आपण 50 हजार सभासदांचे व नवीन सभासदांचे मिळून पुन्हा 90 कोटीच्या आसपास भागभांडवल उभे करणार आहोत. यामधून पुन्हा कारखान्याची पत वाढेल व त्यातून जिल्हा मध्यवर्ती बँक व इतर माध्यमातून कारखाना सुरळीतपणे चालविण्याचा प्रयत्न केला जाईल.

सध्या पाटील कुटुंबियांकडे असलेली आमदारकी व बँकेचे चेअरमन पद या दोन पदांचा वापर करून फक्त पाटील कुटुंबीय व किसन वीर कारखाना बचाव पँनेलच किसन वीर कारखान्याला या परिस्थितीतून बाहेर काढतील असा विश्वास यावेळी नितिन पाटील यांनी बोलून दाखवला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यजीत वीर व संदीप डेरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन नाना देवकर यांनी मानले.

संदीप पोळ यांच्या प्रवेशाने कवठे राष्ट्रवादीची ताकद वाढली

माजी संचालक संदीप पोळ यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केल्याने कवठे गावातील राष्ट्रवादी गटाची ताकद 90 टक्क्यांवर गेली आहे. त्यामुळे इथून पुढच्या सर्वच निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी पक्षाला याचा फायदा होणार आहे. कवठे गावातील विरोध हा पूर्णत: संपुष्टात आला असून लवकरच सर्व गाव राष्ट्रवादीमय करणार असल्याचे यावेळी राहुल डेरे यांनी सांगितले.

Leave a Comment