नवी दिल्ली I देशातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह लाईफ इन्शुरन्स कंपनी LIC ने ग्राहकांना आपल्या नावाने विकल्या जाणाऱ्या ‘कन्यादान’ पॉलिसीमध्ये पैसे गुंतवू नयेत असा इशारा दिला आहे. मुलीच्या लग्नासाठी फंड उभारण्याचा दावा करणारी ही पॉलिसी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.
LIC ने नुकतेच ट्विट केले की, कंपनीकडून अशी कोणतीही पॉलिसी विकली जात नाही. LIC ने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘ऑनलाइन/डिजिटल प्लॅटफॉर्मवर काही अयोग्य आणि दिशाभूल करणारी माहिती येत आहे की, LIC ‘कन्यादान पॉलिसी’ ऑफर करत आहे. LIC अधिकृतपणे स्पष्ट करू इच्छिते की, कंपनी या नावाची कोणतीही पॉलिसी ऑफर करत नाही.’
भुरळ पाडणाऱ्या स्कीममध्ये लोकं अडकत आहेत लोकं
यापूर्वी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर या पॉलिसी बाबत मोठे दावे केले जात होते. या पॉलिसीमध्ये दररोज 130 रुपयांची छोटी गुंतवणूक करून तुम्ही मुलीच्या लग्नापर्यंत 27 लाख रुपयांचा मोठा फंड जमा करू शकता, असे सांगण्यात आले. त्यामुळे अनेक लोकं या भुरळ पडणाऱ्या योजनेत अडकत आहेत. आता LIC ने सांगितले आहे की,” तुम्ही आमच्या कोणत्याही प्रॉडक्ट्सची माहिती https://licindia.in/ या लिंकवर जाऊन मिळवू शकता. तुम्ही या व्यतिरिक्त कोणतीही पॉलिसी खरेदी केल्यास त्याबाबतची आम्ही गॅरेंटी देणार नाही.”
वयानुसार पॉलिसी विकली जात होती
LIC ‘कन्यादान’ पॉलिसीच्या विक्रेत्यांनी दावा केला आहे की, खरेदीच्या वेळी वडिलांचे वय 30 पेक्षा जास्त असावे, तर मुलीचे वय 1 वर्षापेक्षा जास्त असावे. म्हणजेच, मुलगी 1 वर्षाची झाल्यावर तुम्ही या पॉलिसीमध्ये गुंतवणूक सुरू करू शकता. यामध्ये वडील आणि मुलीच्या वयानुसार वेगवेगळ्या पॉलिसी उपलब्ध आहेत.
22 वर्षांपर्यंत डिपॉझिट आणि 25 व्या वर्षी मॅच्युरिटी
पॉलिसीमध्ये असा दावा करण्यात आला होता की, तुम्हाला त्यात फक्त 22 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल तर तुम्हाला तीन वर्षांपर्यंत एकही पैसा गुंतवावा लागणार नाही, तरीही तुम्हाला व्याज मिळत राहील. पॉलिसीची मॅच्युरिटी 25 व्या वर्षी असेल. यानुसार, जर तुम्ही दरमहा 4,530 रुपये जमा केले, तर मॅच्युरिटीवर तुम्हाला 31 लाख रुपये मिळतील असा दावा करण्यात आला होता.