हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर विधान परिषदेच्या जागेवर अखेर काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. सतेज पाटील यांच्या विरोधातील भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अमल महाडिक आणि शौमिका महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांची नवी दिल्लीत बैठक झाली. यावेळी महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणूका बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही वेळातच अमित शहा यांनी धनंजय महाडिक यांना फोन करून अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना केली. यानंतर महादेवराव महाडिक यांच्या सोबत चर्चा झाल्यानंतर अर्ज मागे घेण्याचे निश्चित करण्यात आले.
दरम्यान, मी भारतीय जनता पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे. पक्षाने आदेश दिला की निवडणूक लढ, मी तयार झालो. त्याच पद्धतीने आज आमचे नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा यांचा, तसंच पक्षाचा आदेश मान्य करुन माझा उमेदवारी अर्ज मागे घेत आहे, असं मत अमल महाडिक यांनी व्यक्त केलं.