कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये भाच्याचे भांडण सोडवताना झालेल्या हाणामारीत मामाला आपला जीव गमवावा लागला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील धामडमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावेळी तंबाखूसाठी चुना मागितल्याच्या कारणावरुन दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. या हाणामारीत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. अनिल रामचंद्र बारड असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कुंभारवाडी भागात मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. या हाणामारी प्रकरणी राधानगरी पोलिसात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
घटनेच्या दिवशी जितेंद्र खामकर आणि विकास कुंभार या दोघांमध्ये तंबाखूसाठी चुना मागितल्याच्या कारणावरुन मारामारी झाली. या दोघांमधील वाद मिटवण्यासाठी जितेंद्रने मामा अनिल रामचंद्र बारड यांना बोलावून घेतले. अनिल बारड हे कोल्हापूर जिल्हा संघात गोकुळ शिरगांव शाखेत मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.
मामावर धारदार चाकूने दोनदा वार
घटनेच्या दिवशी रात्री अकरा वाजताच्या सुमारास मामा-भाचा दोघं जण कुंभारवाडी या ठिकाणी गेले. त्यावेळी आरोपी विकास कुंभार याने जवळ असलेल्या धारदार चाकूने अनिल बारड यांच्यावर दोन वेळा वार केले. त्या हल्ल्यात अनिल रामचंद्र बारड हे गंभीर जखमी झाले. यानंतर जितेंद्रने मामा अनिलला उपचारासाठी कोल्हापूरला नेत असताना अर्ध्या रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच राधानगरी पोलिसा तातडीने घटनास्थळी दाखल झाले. राधानगरी पोलिसांनी आरोपी विकास कुंभार याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करत आहेत. पोलीस निरीक्षक एस. एस. कोळी आणि पोलिस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.