कोल्हापूरात स्ट्रीट लाईटसाठी दलित महासंघाने केलं ‘यमराज’ आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतीनिधी । सतेज औंधकर

गांधीनगर मेन रोडवरील वळीवडे कॉर्नर ते चिंचवाड रेल्वे फाटकापर्यंत स्ट्रीट लाईटच्या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. आंदोलनस्थळी एक कार्यकर्ता दुचाकीवरून पडून मृत्युमुखी पडल्याचे भासवतो तर दुसरा कार्यकर्ता यमराजाच्या रूपात म्हशीवरून येतो. या आगळ्यावेगळ्या निदर्शनांमुळे संपूर्ण गांधीनगर बाजारपेठेचे लक्ष या आंदोलनाकडे वेधले गेले. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दबडे व शहराध्यक्ष राजू कांबळे यांनी केले.

वळीवडे कॉर्नरपासून चिंचवाड रेल्वे फाटकापर्यंतचा रस्ता अंधकारमय असतो. तिथे स्ट्रीट लाईटची सोय नाही. प्रामुख्याने येथे ट्रान्सपोर्ट व्यवसाय असल्याने इथे लाईटची अत्यंत गरज आहे. रस्त्यावर ठीकठिकाणी पांढरे पट्टे व गतिरोधक नसल्याने येथे वारंवार अपघात होतात. काहीना या रस्त्यावर आपला जीव गमावला आहे. गेल्या वर्षीपासून या सेवा सुविधा मिळाव्यात म्हणून दलित महासंघातर्फे वेळोवेळी मागणी करण्यात आली. परंतु अद्याप या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने निदर्शने करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दबडे यांनी स्पष्ट केले.दरम्यान, वळीवडेचे लोकनियुक्त सरपंच अनिल पंढरे व उपसरपंच प्रकाश शिंदे यांनी आंदोलकांची भेट घेतली.

हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असल्याने त्यांच्याशी संपर्क साधावा लागेल. ग्रामपंचायतीला इतका निधी खर्च करण्यावर मर्यादा येतात. शासनाने त्यासाठी निधी मंजूर करावा लागेल. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे अनिल पंढरे यांनी आंदोलकांना सांगितले.निदर्शनात अशोकराव गायकवाड, अर्जुन बुचडे, आप्पासाहेब कांबळे, वीरेंद्र भोपळे, रामभाऊ साळोखे, गणेश देवकुळे, लखन कांबळे, भरत माने, नामदेव आवळे, भरत कांबळे, अर्जुन कांबळे, रजत घाटगे, नितीन घोरपडे, नबीसाहेब नदाफ यांनी भाग घेतला.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment